मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांचं नाव घेतल्यावर संतापणार नाही, असा मनसैनिक नसावाच!
बृजभूषण सिंह यांनी केलंच होतं तसं. मनसेची कडवी हिंदुत्ववादी भूमिका पुढे नेण्यासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण भुतकाळातील हिंदी भाषिकांना मारहाणीचे प्रकरण उकरून बृजभूषण यांनी राज ठाकरेंकडे माफीची मागणी केली. एवढंच नाही तर चुहा म्हणत हिणवलंही. त्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव राज ठाकरेंनी अयोध्या दौराच रद्द केला. आता तेच बृजभूषण सिंह पुण्यात येत असताना मनसेने आक्रमक होण्याऐवजी मवाळ भूमिका घेतली आहे. त्याचं कारण राज ठाकरेंचा आदेश आहे. त्यामागील राजकीय कारण हे मनसेच्या भविष्यातील कडव्या हिंदुत्वाच्या मार्गावरील वाटचालीत भाषिक संघर्षाचा अडथळा येऊ नये, हे असल्याची चर्चा आहे.
भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही, असं पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी स्वत: बृजभूषण यांच्या दौऱ्याला विरोध न करण्याचे आदेश दिल्यानंतर वसंत मोरेंनी ही भूमिका मांडली आहे.
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष असलेल्या बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यांच्या राज ठाकरेंविरोधातील आक्रस्ताळ्या भूमिकेमुळे यावेळच्या पुणे दौऱ्यात मनसेच्या विरोधाची धग सहन करावी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, खासदार बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केल्यानंतर आता नेमकं काय होईल, ती चर्चा थंडावली आहे.
भाजपाच्या दबाबापेक्षा हिंदुत्वाचे राजकारण, हेच कारण!
बृजभूषण सिंह हे भाजपाचे खासदार असल्याने मनसेवर भाजपाचा दबाव असल्याने राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केलाच, पण आता ते महाराष्ट्रात येत असताना त्यांना विरोधही करत नसल्याची चर्चा रंगत आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी एबीपी माझा या न्यूज चॅनलशी बोलताना, आम्ही कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली येणारे नाहीत. वेळोवेळी झालेल्या आंदोलनातून आम्ही हे दाखवून दिलं आहे, असं स्पष्ट केले आहे. मात्र, थेट भाजपाचा दबाव नसला तरी भविष्यात हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण करत मनसेचा राजकीय प्रभाव वाढवण्याच्या राज ठाकरेंच्या रणनीतीत अडथळा येऊ नये, हे कारण असल्याची चर्चा आहे. शिवसेनेची साथ नसताना दुसऱ्या ठाकरेंची साथ भाजपाला लागली तर त्यावेळी युती करण्यात अडथळा नसावा, असेही मनसेचा विरोध मंदावण्यामागील कारण असू शकतं.
पाहा: