मुक्तपीठ टीम
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग हिमाचल प्रदेशसह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र गुजरातची घोषणा लांबणीवर गेली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर केल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशसह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाल्या आहेत.
२०१७ च्या परंपरेचा संदर्भ-
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत याचं उत्तर स्वत: निवडणूक आयोगाने दिले आहे.
- निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये एकाचवेळी विधानसभा निवडणुका जाहीर न करण्यामागे २०१७ मध्ये अवलंबलेल्या परंपरेचा संदर्भ दिला.
- आयोगाने सांगितले की, यावेळी आदर्श आचारसंहिता विनाकारण वाढवण्यात आली नाही.
- निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका का जाहीर केल्या नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना प्रत्यक्षात नियमांचे पालन करतो.
आयोगाने पूर्वीची परंपरा पाळली आहे.
गुजरातमध्ये मतमोजणी ८ डिसेंबरला होणार का?
- २०१७ मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना जाहीर झाल्या होत्या, परंतु मतमोजणी एकाच वेळी १८ डिसेंबर रोजी झाली होती.
- निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
- १७ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार असून १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
- ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
- हिमाचल प्रदेशसह गुजरातची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे का, असे विचारले असता कुमार म्हणाले की, आम्ही गुजरात निवडणुकीची घोषणा करू तेव्हा तुम्हाला कळवू.
निवडणूक आयोगाने परंपरा पाळत प्रत्यक्षात बदल केला…
- तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, गुजरातच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर कालावधीत घेणे अजूनही शक्य आहे, जेणेकरून मतमोजणी एकाच दिवशी होऊ शकेल.
- निवडणूक आयोगाने २०१७ मध्येही असेच केले होते.
- काही विरोधी नेत्यांनी सांगितले की, गुजरातच्या निवडणुका नंतर जाहीर करून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारला अधिक कल्याणकारी योजना सुरू करण्याची संधी मिळू शकते.
- राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाने परंपरा पाळत प्रत्यक्षात बदल केला.
हिमाचलमध्ये हवामान हा एक अतिशय महत्वाचा घटक!!
- राजीव कुमार म्हणाले की, एका निवडणुकीच्या निकालाचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो यासारख्या मुद्द्यांचाही विचार केला जातो.
- ते म्हणाले की हिमाचल प्रदेश सारख्या राज्यात हवामान हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे, विशेषत: उच्च उंचीच्या भागात.
- ते म्हणाले की, सर्व काही तपासून निवडणूक आयोगाने मागच्या वेळी जी परंपरा पाळली होती तीच पाळण्याचा निर्णय घेतला…
- एकीकडे आम्ही परंपरा पाळली, त्याचवेळी ती बदलली, कारण आदर्श आचर संहितेचा कालावधी अनावश्यकपणे वाढू नये.