मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अॅड. अनिल परब हे सातत्याने भाजपाच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसत आहे. सचिन वाझेपासून ते गावच्या रिसॉर्टपर्यंत प्रत्येक प्रकरणात भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला. त्यातही भाजपाचे आक्रमक आणि अभ्यासू नेते किरीट सोमय्या यांनी तर अनिल परबांना सातत्याने लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यातूनच अनिल परबच का सातत्याने लक्ष्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याच्या गृहमंत्रीपदावरून अनिल देशमुख पायउतार झाल्यानंतर भाजपाने संजय राठोडांच्या रुपाने पुढचं लक्ष्य साधले. त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या थेट परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेत यानंतर नंबर अनिल परब यांचा लागणार आहे असे सांगितले होते. या वक्तव्यावरच न थांबता त्यांनी परबांविरोधात चौकशी करत आरोपांच्या फैरी झाडणे सुरुच ठेवले. थेट कोकणापर्यंत जात त्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टचेही प्रकरण लाऊन धरले. त्यामुळे आता ईडीच्या नोटीसनंतर एकच खळबळ माजली आहे. भाजपाच्या हिटलिस्टवर अॅड. अनिल परब का आहेत, यावर राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरण हे बनावट असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून शिवसेना लक्ष्य झाली होती. मात्र, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर थेट आरोप करणारा शंभर कोटीच्या महावसुलीचा आरोप करणारा लेटर बॉम्ब फोडला. त्यानंतर स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या शिवसेना संबंधांचा हवाला देत भाजपाच्या रेंजमध्ये असलेली शिवसेना काहीशी बाजूला गेली. अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवरच हल्लाबोल सुरु झाला. मात्र, त्याचवेळी सोमय्यांसह काही नेत्यांनी सचिन वाझेंच्या संपर्कात असलेल्या एका विधान परिषद सदस्याचा उल्लेख करत संशय निर्माण करणे सुरु ठेवले होते. पुढे तर थेट नाव घेत गृहखात्याबद्दल अनिल परबांना लक्ष्य करण्यात आले.
अनिल परबच का हिटलिस्टमध्ये टॉपवर?
- शिवसेना, ठाकरे कुटुंबीयांच्या जवळच्या वर्तुळात अनिल परब हे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
- कॉर्पोरेट सेक्टरपासून न्यायालयीन वर्तुळापर्यंत अनिल परबांचा वावर असतो.
- शिवसेनाप्रमुखांचे मृत्यूपत्र असो की शिवसेनेची कोणतीही कायदेशीर लढाई तेथे अनिल परब असतातच असतात.
- मनसे नगरसेवक फोडण्यापासून ते इतर अनेक गोपनीय राजकीय हालचालींमध्ये परब हे कुठेही, काहीही न बोलता सक्रिय असतात.
- त्यामुळे भाजपाप्रमाणेच मनसेच्याही हिटलिस्टवर ते आहेत.
- ठाकरे मंत्रिमंडळात परिवहन मंत्री असलेले अॅड. अनिल परब हे तसे मितभाषी आहेत, मात्र ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेसाठी ते रस्त्यावरच्या शिवसैनिकासारखे आक्रमक होतात.
- नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणातील त्यांची भूमिकाही भाजपाचा संताप वाढवणारी ठरली.
- त्यातही त्यांनी न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोरच सरकारी अधिकाऱ्यांना नारायण राणेंच्या अटकेसंदर्भातील कारवाईबद्दल झापल्याची क्लिप त्यांना वादाच्या भोवऱ्यात ओढणारी ठरली.
अनिल परबांच्या कोणत्या चुकांमुळे भाजपाला निमित्त?
- सत्ता आल्यापासून त्यांच्या वागण्यात काहीसा तुटकपणा, अंहभाव आल्याचे मानले जाते.
- त्यामुळे त्यांच्या जवळचीही काही माणसे दुरावली आहेत.
- त्यातूनच त्यांच्या हालचालींची माहिती भाजपाच्या नेत्यांना मिळू लागली असावी.
- अनिल परबांकडे येणारे-जाणारे, त्यांच्या संपर्कात असणारे यांची माहिती बाहेर येऊ लागली.
- त्यातच मुख्यमंत्र्यांच्या अतिविश्वासातील असल्याने स्वाभाविकच सर्वच क्षेत्रातील, सर्वच खात्यांशी संबंधित कामे असणाऱ्या उद्योग, प्रशासकीय वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तींचा राबता वाढला.
- त्यातून शिवसेनेतीलच नाही तर आघाडीतीलही अनेकांच्या ते नजरेत खुपू लागले.
मुंबई मनपासाठी शिवसेनेची रणनीती ठरवण्यातील महत्वाची भूमिका
- अनिल परब हे उद्धव ठाकरेंच्या अतिविश्वासात विनाकारण नाहीत.
- अनिल परबांचे कायद्याचे ज्ञान, अनिल देसाईंप्रमाणेच शिवसेनेत क्वचितच आढळणारी अभ्यासू वृत्ती.
- त्यातून निवडणुकीच्या रणनीतीतील मतदारसंघनिहाय सखोल अभ्यास
- विशेषत: मुंबई मनपाच्या प्रभागांची चांगली माहिती.
- प्रभाग पुनर्रचनेतून अनुकूल मतदारसंघ घडवण्याच्या रणनीतीचे जाणकार
- आताच्या मनपा निवडणुकीतील अटीतटीच्या लढाईत शिवसेनेसाठी महत्वाचा शिलेदार
- त्यातूनच शिवसेनेच्या या महत्वाच्या मोहऱ्याला लक्ष्य करण्यासाठी भाजपाने निवडले असावे, अशी शक्यता आहे.