मुक्तपीठ टीम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आरोपांच्या फैरी खूप आधीपासून झाडायला सुरुवात केली. पण कारवाईसाठी आताचा मुहूर्त निवडला, यामागे भाजपाने प्रतिष्ठेची केलेली मुंबई मनपाची निवडणूक असल्याचं बोललं जातं. अनिल परब हे शिवसेनेची मुंबईतील स्थानिक रणनीती ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळेच त्यांना मनपा निवडणुकीपूर्वी कायदेशीर कारवाईत गुंतवलं गेल्यानं शिवसेनेला फटका बसेल, असं मानलं जातं.
अनिल परब शिवसेनेचे मातब्बर नेते-
- अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे समजले जातात.
- अनिल परब यांची मुंबईतील वॉर्ड निहाय समीकरणावर विशेष पकड आहे.
- मुंबई मनपा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या रणनीतीमध्ये परब यांची मोठी भूमिका असते. २०१७ मध्ये मुंबई मनपाची निवडणूक शिवसेनेने जिंकली. या निवडणुकीच्या विजयात अनिल परब यांचा मोठा वाटा होता.
- अनिल परब यांना पक्षाकडून २०१२ मध्ये विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते.
- त्याआधी वांद्रे येथील पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करण्यात परब यांची मोठी भूमिका होती.
- परब हे २०१७ मध्ये शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते झाले होते.
- त्यानंतर त्यांना पक्षाने पुन्हा २०१८ मध्ये विधान परिषदेवर पाठवले.
- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनिल परब यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.
मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना लक्ष्य-
- केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- शिवसेनेचे काही मोठे नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
- मुंबई मनपावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी विरोध प्रयत्न करत असताना शिवसेनेच्या अनिल परबांवर कारवाई सुरू आहे.
- त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे.
- अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई मनपा निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.