मुक्तपीठ टीम
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून प्रथमच दोन मेळावे झाले. ठाकरे असो की शिंदे दोन्ही गटांच्या मेळाव्यात गर्दी ओसंडून वाहताना दिसत होती, हे आपल्याला मान्य करावं लागेल. फक्त गर्दी हा निकष लावला, तर होय दोन्ही मेळावे सुपरहिट होते. जेव्हा अशाप्रकारे दोघांकडे ही गर्दी दिसली तर इतरांनी सुद्धा त्याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. अर्थात गर्दी हा एकच निकष असू शकत नाही. दुसरा असतो तो इव्हेन्ट मॅनेजमेंटचा. शिंदे गटाला भाजपाची साथ मिळाली होती त्यामुळे त्यांचं इव्हेन्ट मॅनेजमेंट चांगलंच होतं. शिवतीर्थावरही तसंच. शिवसेनेचं तर ते कौशल्यचं आहे. बाळासाहेब हयात होते तेव्हा ही असंच असायचं.
कालच्या मेळाव्यांमध्ये एक फरक दिसला तो म्हणजे, शिवसेनेच्या भाषणांमध्ये जे मांडलं जात होतं, त्या विचारांचा. बीकेसीतील मेळाव्यात आजवर जे ऐकलं त्याचीच उजळणी, त्या त्या वक्त्याच्या शैलीत केली जात होती. त्यात नवं काही दिसलं नाही. पुन्हा भाषणं लांबवलीही भरपूर गेली. याउलट शिवाजी पार्कात आटोपशीर नियोजन दिसलं. तसंच ठरवून मुद्देसुद मांडणीवर भर दिल्याचं जाणवलं. अगदी सुषमा अंधारे, खरंतर त्या आणि शिवसेनेचे विचार मांडतात, याच्याबद्दल अनेकजण आक्षेप घेतात. कारण त्या आंबेडकरवादी विचारसरणीच्या आहेत. मात्र त्यांनीसुद्धा काल ज्या शब्दात शिंदे गटातल्या नारायण राणे, रामदास कदम,एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आणि त्यांना जो टाळ्याचा प्रतिसाद मिळाला, त्याहीपेक्षा शिवाजीपार्कवर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांकडून आणि शिवसेना समर्थकांकडून झेंडे आणि हातातले रुमाल हलवत जो प्रतिसाद मिळाला, त्या जिवंत प्रतिसादाला खूप महत्व असतं. सुषमा अंधारे शिवसेनेत काल परवा आलेल्या आहेत. तरीसुद्धा त्यांच्या भाषणाच्यावेळी लोकांचा भरपूर प्रतिसाद दिसत होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत बोलायचे झाले, तर त्यांनी भाषण करताना सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे सुद्धा करायचे तेच केलं. सभेला जनसागरासमोर ते नतमस्तक व्हायचे, तेच उद्धव ठाकरेंनी केलं. नंतर आधार घेत उठल्यावर त्यांनी आठवण करून दिली की, सध्या डॉक्टरांचा सल्ला आहे मला वाकायचं नाही, मात्र मला राहावलं नाही. मी भारावून गेलो. हे त्यांचं सुरुवातीचे शब्द होते. तसंच त्यांनी ज्या ज्या मुद्द्यांवर, लोकल ते नॅशनल…आपलं भाष्य दिलं, त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. अगदी एकेकाळचे मित्र असणाऱ्या अडवाणींच्या जिनांच्या कबरीससमोर झुकण्याचा त्यांनी जो उल्लेख केला. पंतप्रधान मोंदीचं पाकिस्तानच्या पंतप्रधानच्या वाढदिवसानिमित्त अचानक जाऊन केक खाणं त्याबद्दल ते बोलले. त्याचबरोबर मोहन भागवतांचं मशिदीत जाणं. संघाचे सरकार्यवाह होसबाळेंनी नुकतीच जी मतं मांडली, अर्थव्यवस्था, विषमता यावरची ती मत यावर त्यांनी आठवण करून दिली. असे अनेक वेगळे मुद्दे होते जे शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या संघर्षापलिकडील जगाचीही जाणीव करून देणारे होते.
त्याचवेळी आपण जर बीकेसीतल्या मेळाव्याकडे वळलो. नक्कीच गर्दी होती. इव्हेंट मॅनेजमेंट खूप जबरदस्त होतं. परंतु थोडीशी अडचण कुठे झाली की भाषणं करताना तो दसरा मेळावा आहे, इथं आपल्याला नवा विचारसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना द्यायचा आहे तिथं कुठे तरी नियोजनाचा अभाव जाणवला.
राजकीय नेते मग ते पंतप्रधान मोदी असो किंवा उद्धव ठाकरे. त्यांना मुद्दे ही त्यांची टीम काढून देत असते. अनेकदा भाषणसुद्धा लिहिली जातात. भाषण लिहून घेण्यात किंवा भाषणातील मुद्दे आधीच ठरवणं हे गैर नाही. ते अतिशय योग्य नियोजन असतं. पण लिहिलं आहे म्हणून जेव्हा एखादा वक्ता भाषण वाचायला लागतो ना तेव्हा त्याचा संपर्क भाषण ऐकायला आलेल्या श्रोत्यांशी तुटतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले वक्ते नाहीत असे नाही. कारण विधानसभेतील भाषण तुम्ही आठवा. अनेकदा घडतं काय तुम्हाला माहितीय का की, प्रत्येकाची एक शैली असते. ती विसरून चालत नसतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एवढी वर्ष राजकारण करत आहेत त्यांच्याकडे वकृत्व नाही असं कसं म्हणायचं? म्हणजे तुम्ही प्रत्येकाकडून राज ठाकरेंसारख्या वक्तृत्वाची अपेक्षा ठेवू शकत नाही. राज ठाकरेंची एक आपली वेगळी शैली त्यांनी स्वत: ती बाळासाहेब ठाकरेंकडून घेतलीय.उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब आणि राज ठाकरेंपेक्षा फार वेगळी शैली आहे. आणि त्यात ती अस्तित्वाच्या लढाईत अधिकच धारदार होताना दिसतेय. एकनाथ शिंदे यांची सुद्धा ठाणे जिल्ह्यातून विकसित होत आलेली एक वेगळी शैली आहे. अनेकांनी धट्टा केलीय. धट्टा करणारे कोण असतात? समाजातील तो प्रस्थातित वर्ग. विधानसभेमध्ये ज्या शैलीत एकनाथ शिंदे बोलत होते ना त्यावेळी तुम्ही आठवा जरा त्यांना मध्ये मध्ये काहीवेळा कागद जेव्हा येत, तेव्हा ते गोंधळायचे. नको ते सुद्धा वाक्य त्या कागदावर लिहून देण्यात आले त्यांनी तेव्हा ते उच्चारले त्यानंतर नाही नाही असं नाही हे नाही असं म्हटलं सुद्धा. त्यांना कळतं ना राजकीय नेता म्हणून काय बोलायचे. परंतु अनेकदा घोळ कुठे होतो, जी शैली नाहीय त्या शैलीत जर कोणी वेगळं लिहून देत असेल आणि तेच बोलावं असा जर अट्टाहास असेल तर गोंधळ होतो. काहीवेळा माझ्या मनात एक वेगळी विचार प्रक्रिया सुरु असते. माझी उपजत एक वेगळी शैली असते. म्हणजे तुम्ही विचार करा दिलीपकुमीरचे डायलॉग अक्षयकुमारच्या तोंडी शोभतील का? दोघांची वेग-वेगळी शैली आहे. त्यामुळे त्या शैलीच्या बाहेर जाऊन लिहिलेलं वाचणं आणि पुन्हा ते काहीतरी अलंकारीत भाषेत बोलणं गोंधळ उडवतं. जी एकनाथ शिंदे यांची शैलीच नाहीय, मला असं वाटतं की तिथं कुठेतरी घोळ होताना दिसतोय.
मुद्दे वाचलेच पाहिजेत. त्यासाठी आधी वर्तमान प्रश्नाचा अभ्यास केलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलाल तर एक खटकणारचं होतं ना. की नाणार सारखा मुद्दा, वेदांतासारखा मुद्दा तेवढंचं कशाला मराठी शाळा बंद करायचा घाट घातला जातोय म्हणून ट्विटरवर गेले तीन-चार दिवस मोहिम चालतेय. वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या शाळा बंद करायचे फरमाने काढली जातातयत. या मुद्द्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी टीका करणं अपेक्षित होतं. त्यांची दखल घेणं अपेक्षित होतं. तसंच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. एकनाथ शिंदे यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. सरकारी निर्णयांवर बोलत भाषण लांबवताना यावरही सरकार म्हणून रोखठोक बोलण्याची संधी होती. ती गमावली.
शिंदेंच्या मेळाव्यात आणखी एक खटकणारं होतं. तिथं एकाच वेळी अनेक गोष्टींचा मारा होता. त्यामुळे मनावर इप्सित ते ठसण्यापेक्षा गोंधळ उडत होता. थापा तिथे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला काही वेळ उभे राहिलेले दिसले. प्रयत्न असेल तो की बाळासाहेबांची आठवण करून देण्याचा. पण ते सेवक होते ते राजकिय पदाधिकारी होते का? ते ही चालून गेलं असतं. पुढचं जे घडलं आहे ना जयदत्त ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार बिंदुमाधव ठाकरे, मला काही कळलं नाही, बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्या व्यक्तींमुळे त्यांना त्रास झाला आणि त्यांनी तो व्यक्त ही केलेला, त्यांची शिंदे गटाच्या मेळाव्यातील उपस्थिती ही बाळासाहेब यांना मानणाऱ्या शिवसैनिकांना खरचं रुचली असेल का? हा इव्हेंट कोणी मॅनेज केला असेल ना, त्यांच्या डोळ्यासमोर तो वर्ग असेल जो ठाकरेंना ओळखत नाही. जो कदाचित मराठी नसावा. त्यामुळे नॅशनल मीडिया किंवा काही स्थानिक माध्यमांमध्ये सुद्धा मी पाहिलं की “ठाकरेंचे बंधु शिंदे गटाच्या मंचावर” अशा ब्रेकिंग चालण्यासाठी ठीक आहे. परंतु तुम्हाला माध्यमांसाठी फक्त भाषणं नाही करायची ना. तुम्हाला त्या वर्गाला स्वत:कडे आणायचं आहे की ज्याच्या मनात तुमच्याबद्दल राग आलेला आहे की तुम्ही शिवसेना सोडली. त्यामुळे कुठेतरी हा विचार झाला पाहिजे होता. त्याबद्दल नियोजन करणाऱ्यांनी जर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असती, तर मला असं वाटतं काही बदल दिसला असता.
अजित पवार यांनी मु्द्दा मांडला की, एसटी सर्व हायजॅक केल्याने गावच्या लोकांचं दसऱ्याच्या सणाच्या आधी आणि नंतर हाल झाले. हा जो त्यांनी मुद्दा मांडला ना तो योग्यच आहे. त्यातून बदनामीच पदरी आली असणार. विचार करा. आणि त्यात पुन्हा काय घडलं माहितीय का? पुन्हा एकदा तेच की मीडिया मॅनेज करायचं प्रसिद्धी मिळवायची पण ती कुठे मिळवायची त्यासाठी जे पत्रकार बोलवले होते. त्या पत्रकारांनी ईमानीत भूमिका पार पाडली. त्यामुळेसुद्धा थोडी अडचण झाली. सत्तार यांनी खूप चांगलं नियोजन केलं. पण झालं कसं जे बाईट टिव्हीवर ऐकायला मिळाले की, ते महाराष्टाला रुचणारं नाही. कुठे निघालात नाही सत्तार शेठ प्रोग्रामाला. कुठे निघालात – मुंबईला.
आता सांगा दसरा मेळाव्याला लोक येतात ते ठाकरेंना ऐकायला, शिवसेना मेळाव्याला. हे सत्तार शेठ ऐकताना महाराष्ट्राला खरंच आवडलं असणार?
तिथं नागपुरातून येणाऱ्या महिलांनी तर थेट आनंद शिंदेंचं नाव घेतलं. पालघरमधील आदिवासींना श्रमजीवीचा मोर्चा सांगितला गेला होता. एकंदरीतच मीडियाची साथ असूनही मेळाव्याला येणाऱ्यांना योग्य माहिती नसल्यानं ऐकणाऱ्यांनी बीकेसीवरील गर्दी आणलेली वाटली. तर कसलीही व्यवस्था नसतानी कोरडा भाकर तुकडा खाताना टीव्हीवर दिसलेली शिवाजी पार्कवरील गर्दी स्वत:हून आलेली जाणवली.
त्यामुळेच गर्दी दोन्हीकडे असली तरी आणलेली आणि आलेली असा फरक मेळावा कुणाचा खऱ्या अर्थाने यशस्वी, तेही दाखवून गेला.