मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. भाजपाचं २०१४पेक्षा २०१९मध्ये संख्याबळ घटल्यानं आपली तिसरी जागा टिकवण्यासाठी या जागेवर प्रयत्न करावे लागणार आहेत. तर त्याचवेळी स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केल्याने आता त्यांना कोण साथ देईल, यावरही राजकीय पर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
राज्यसभेच्या ५७ खासदारांच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून सहा खासदार निवडून जाणार आहेत. आता महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी मोठी चुरस दिसण्याची शक्यता आहे. सहावी जागा भाजप राखणार की राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून, २०२२ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, भाजपला महाराष्ट्रातील तिसरी जागा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे.
महाराष्ट्रातून कोण निवृत्त?
भाजपा
- पीयूष गोयल
- विनय सहस्रबुद्धे
- विकास महात्मे
शिवसेना
- संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस
- प्रफुल पटेल
काँग्रेस
- पी. चिदंबरम
राज्यसभेसाठी मतदान कसे होणार?
- महाराष्ट्र विधानसभेचे २८८ सदस्य या निवडणुकीत मतदार आहेत.
- राज्यसभेच्या एका जागेमागे ४२ मतांचा कोटा आहे.
- कोटा आणि पक्षीय संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक असे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
सहाव्या जागेसाठी चुरस
- भाजपाचे दोन उमेदवार आरामात निवडून आल्यानंतरही २२ मते अतिरिक्त राहतील.
- महाविकास आघाडीकडे २७ मते अतिरिक्त उरतील.
- इतर पक्षांकडे २९ मते आहेत.
- त्यामुळे भाजपाने आपला तिसरा उमेदवार मैदानात उतरवल्यास त्यांना इतर पक्षांकडील किमान २० मतांची व्यवस्था करावी लागेल.
- जर महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार उतरवला तर त्यांना इतर पक्षांमधून १५ मते जमवावी लागतील.
संभाजी छत्रपतींना पाठिंबा मिळणार?
- संभाजी राजे छत्रपती यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांना सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला, तर राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणे शक्य आहे.
- पण तसे घडणार का, हाच खरा प्रश्न आहे.
- जर ते आघाडी किंवा भाजपा यांच्यापैकी एकाच्या पाठिंब्याने अपक्ष उभे राहिले तर त्यांच्यापुढे उरलेली मते जमवण्याचं आव्हान असेल. ते त्यांच्यासाठी कोण करणार, हाही प्रश्न आहे.
- त्यामुळे राज्यसभेवर त्यांना सन्मानाने पाठवलं जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम
- या निवडणुकीसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.
- ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
- १ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
- ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
- १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४पर्यंत मतदान होईल
- १० जूनलाच सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल.