मुक्तपीठ टीम
जगभरात कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यूएचओकडून तपास सुरु आहे. कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी चीनला भेट देणार्या डब्ल्यूएचओ टीमने “कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघुळ आणि इतर प्राण्यांच्या माध्यमातूनही मनुष्याला झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर प्रयोगशाळेतून विषाणू पसरण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावाही या पथकाने केला आहे.
सदर विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेमधून पसरल्याचा आरोप अमेरिका आणि पाश्चत्य देशांकडून करण्यात आला. पण डब्ल्यूएचओच्या तपासात तसं उघड झालेलं नाही. चीन या तपास निष्कर्षाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही याआधी आरोप झाला आहे. कोरोना संसर्गाचा दोष चीनवर येऊ नये, यामुळे त्या देशाने पराकोटीचे प्रयत्न केल्याने तसे आरोप झाले होते.