मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये रविवारी संध्याकाळी मोरबी पूल कोसळून १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात ज्या प्रमाणात झाला आहे ते पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दुसऱ्यादिवशी हा पूल दुरुस्तीनंतर लोकांसाठी सुरु करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे बळी घेणाऱ्या या पूल अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार त्याची चर्चा आता सुरु झाली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही जुना पूल कसा सुरु केला गेला, टोल तिकीटं विकताना पुलाच्या १००-१५० क्षमतेपेक्षा खूपच जास्त टोल तिकिटे का विकली गेली, असे प्रश्न विचारले जात आहेत.
दुरुस्तीचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच एवढी मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करून पुलाच्या देखभालीची जबाबदारी पार पाडणाऱ्या ओरेवा कंपनीच्या भूमिकेवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही कंपनी ज्या समुहाची आहे तो अजंठा-ओरेवा समुह हा घड्याळ निर्मिती क्षेत्रात नामांकित आहे.
मोरबी पूल मृत्यूकांडानंतरचे प्रश्न
- या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
- ओरेवा कंपनी आणि स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणावर प्रश्न विचारले जात आहे.
- पुलाची कमाल क्षमता १०० होती मग अपघात झाला त्यावेळी ४०० हून अधिक लोक मोरबी पुलावर कसे पोहोचले?
- स्थानिक नगरपालिकेने दुरुस्तीनंतर फिटनेस प्रमाणपत्र दिले नसताना हा पूल कोणाच्या आदेशाने पुन्हा सुरु करण्यात आला?
- असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुरुस्तीनंतरही पालिकेचे फिटनेस प्रमाणपत्र नाही!
- हा झुलता पूल एका खासगी कंपनीकडून सात महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लोकांसाठी खुला करण्यात आला होता.
- मोरबी नगरपालिकेचे अधिकारी संदीपसिंह जाला यांनी सांगितले की, नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते लोकांसाठी खुले करण्यात आले होते, परंतु स्थानिक नगरपालिकेने अद्याप फिटनेस प्रमाणपत्र दिलेले नाही.
पुलाची क्षमता १०० तर घटनेवेळी पुलावर ४०० लोक कशी?
- या पुलाची क्षमता केवळ १०० लोकांची आहे.
- या पुलावर येण्यासाठी सुमारे १५ रुपये शुल्क आकारले जात होते.
- दिवाळीनंतरच्या वीकेंडला हा पूल फिटनेस तपासणी न करताच खुला करण्यात आला.
- घटनेच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० लोक उपस्थित होते.
- प्रचंड गर्दीचा भार सहन न झाल्याने पूल पडला.
या कंपनीकडे पुलाच्या देखभालीची जबाबदारी…
- मोरबीवर बांधलेल्या या ब्रिटीशकालीन पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओधवजी पटेल यांच्या ओरेवा ग्रुपकडे आहे.
- ही कंपनी ज्या समुहाची आहे तो अजंठा-ओरेवा समुह हा घड्याळ निर्मिती क्षेत्रात नामांकित आहे.
- यापूर्वी या पुलाची संपूर्ण देखभाल महापालिकेकडे होती.
- नंतर यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
- याच ट्रस्टने काही काळापूर्वी ओरेवा कंपनीसोबत टेंडरद्वारे पुनर्बांधणी व देखभालीचा करार केला होता.
- या गटाने मार्च २०२२ ते मार्च २०३७ पर्यंत १५ वर्षे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि टोल वसुली अशी सर्व जबाबदारी घेतली होती.