मुक्तपीठ टीम
देशात आणि राज्यात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सदर लस देण्यात येत आहे. आता लसीकरणास सुरुवात झाली असून राज्यातील सर्वसामान्यांना लसीचा लाभ कधी घेता येईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्यात प्राधान्यक्रमानुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिक आणि नंतर सर्वसामान्यांना लस दिली जाईल, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले आहे.
तसेच राज्यामध्ये लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतल्यानंतर समाजातील प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहन केले आहे. तर टप्प्या-टप्प्याने ही लस राज्यातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक होते. मात्र, त्यातील ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील, असे टोपे म्हणाले. तसेच दारिद्रय रेषेखालील सर्वांना मोफत लस मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, कोणालाही राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तर गेले ११ महिने कोरोना योद्ध्यांनी आपले प्राण धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवले. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आधी लस दिली जात असल्याचे आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.