प्रा. मुकुंद आंधळकर / व्हा अभिव्यक्त!
महाराष्ट्र शासनाने जुलै २०२१ मध्ये देय असलेली वेतन फरकाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या वेतनासमवेत शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा आदेश ९ मे २२ रोजी काढला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता जुलै २०२१ मध्ये मिळाला असून शिक्षकांना मात्र अद्याप दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाचा दुसरा हप्ता मिळालेला नसलेल्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांनाही अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच समान हप्त्यात दरवर्षी जुलैमध्ये देण्यात येईल असे शासनाने १ मार्च २०१९ आदेशामध्ये नमूद केले आहे. ही रक्कम देण्यास शासन आता हयगय करीत आहे व शिक्षकांना तर त्यापासून वंचित ठेवत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून शिक्षक ही मानहानी सहन करणार नाहीत.
राज्य सरकारने शिक्षकांना त्यांच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम त्वरित व्याजासह द्यावी व तिसऱ्या हप्त्याची रक्कम सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जूनच्या वेतनासमवेत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.
( प्रा. मुकुंद आंधळकर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक आहेत.)