मक्तपीठ टीम
नाताळचा आठवडा सुरु झाला आहे. २५ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जगभरात तयारीला सुरुवात झाली आहे. कॅरल सिंगिंग, ख्रिसमसचं झाड, कौटुंबिक कार्यक्रमांचं नियोजन, केक, वाईन, अनेक भेटवस्तूंसोबतच ख्रिसमसचा सर्वाधिक क्लासिक ट्रेंड असतो तो सिक्रेट सँटा. पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिस्मसच्या सेलिब्रेशनची पद्धतच वेगळी असते मात्र हे सेलिब्रेशन जगभरात इतकं प्रसिद्ध आहे की जगभरातले लोक सिक्रेट सँटाचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत.
जाणून घ्या नाताळबाबाची कहाणी
सिक्रेट सँटामागे अनेक कहाण्या सांगितल्या जातात. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कहाणीनुसार, चौथ्या दशकात तुर्कीमध्ये सेंट निकोलस नावाचे एक वृद्ध गृहस्थ राहत होते. ज्यांना फादर ख्रिसमस किंवा ओल्ड मॅन ख्रिसमसच्या नावानेही ओळखलं जातं. निकोलस यांच्याकडे खूप पैसा होता. आई-वडील नव्हते. ते गरजवंतांना ओळख लपवून, नजरेत न येता सढळ हाताने मदत करायचे. त्याच शहरात एका गरिबाच्या ३ मुली होत्या. त्यांच्याकडे मुलींच्या लग्नासाठी पैसा नव्हता. अशावेळी निकोलस यांनी मदत करण्याचा विचार केला. निकोलस यांनी एके रात्री सोन्याने भरलेली बॅग त्या गरीब व्यक्तीच्या घराच्या छतावरुन चिमणीच्या भागातून सोडली. त्या गरीब व्यक्तीने चिमणीमध्ये मौजे सुकण्यासाठी घातले होते. बॅगेतलं सोनं त्या मौज्यांच्य़ा आसपास पडलं. असं तिनदा घडलं. त्या गरीब व्यक्तीने निकोलस यांना पाहिलं. निकोलस यांनी ही घटना कुणालाही सांगू नको, असं सांगितलं. मात्र ही गोष्ट शहरात पसरली. त्यानंतर कुणालाही काही सिक्रेट वस्तू मिळाली की लोकांना वाटे की, ही वस्तू निकोलस यांनीच दिली आहे.
सिक्रेट सँटा गेम कसा खेळायचा?
- सिक्रेट सँटाचा ट्रेंड हा घरात आणि मित्रमंडळींमध्ये सुरु झाला आहे.
- नावानुसारच सिक्रेट सँटाच्या गोष्टी या सिक्रेट म्हणजे गुप्त राहिल्या पाहिजेत.
- तुम्हीही तुमचे मित्र, मैत्रिणी, निकटवर्तीय किंवा गरजवंतांचे सिक्रेट सँटा बनू शकता.
- तुम्हाला ज्य़ांना भेटवस्तू द्यायची आहे त्यांची निवड करा.
- जर तुम्हाला त्या व्यक्तीची विश लिस्ट माहित असेल तर तुमचं काम अधिक सोपं होऊ शकेल.
- जर तुम्हाला हे माहित नसेल तर त्या व्यक्तीच्या आवडी निवडीनुसार तुम्ही भेटवस्तू देऊ शकता.