मुक्तपीठ टीम
येत्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी संपूर्ण जोर लावल्याचं दिसत आहे. त्यातही सर्वात जास्त खासदार निवडून देणाऱ्या उत्तरप्रदेशावर सर्वच प्रमुख पक्षांचं खास लक्ष दिसत आहे. त्या राज्यावर सत्ता असली तर २०२४च्या लोकसभेसाठी बळ वाढेल, असं समीकरण आहे. पण राज्यातील मतदारांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त असणारा दलित मतदार नेमकी काय भूमिका घेतो, त्यावरही निकालाचा कल ठरणार आपे. पण अद्याप दलित मतदारांच्या मनात काय ते स्पष्ट झालेलं नाही.
उत्तरप्रदेश निवडणुकीत सत्ताबदल होतं का? की पुन्हा भाजपाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. यावेळीही सर्वच पक्ष दलितांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण जोर लावला आहे. समाजवादी गठबंधन आणि भाजपा आघाडी या दोघांचे लक्ष्य हे दलित मतदार आहेत.
दलित मतदारांचा कल बसपाकडे, आता?
दलित मतदारांना त्यांची ताकद चांगलीच समजली आहे.याच ताकदीच्या जोरावर त्यांनी बसपाला सत्तेच्या शिखरावर नेले आहे. १९९३ मध्ये बसपा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.या निवडणुकीत त्यांची मते ११.१२ टक्के होती. बसपाने ६७ जागा जिंकल्या होत्या. १९९६ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी १९.६४ टक्क्यांपर्यंत वाढली. २००२ मध्ये मतांची टक्केवारी २३.०६ टक्क्यांवर पोहोचली आणि ९८ जागा जिंकल्या. २००७ साली बसपाला ३०.४३ टक्के मते मिळाली आणि २०६ जागांसह पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली. मात्र, यात बसपा सुप्रीमो मायावती यांचे दलित ब्राह्मण मतांच्या एकत्रीकरणाचे सोशल इंजिनिअरिंग होते. २०१२ च्या निवडणुकीत बसपाचा आलेख घसरला आणि २५.९५ टक्के मतांसह बसपा ८० जागांवर घसरली. २०१७ च्या निवडणुकीत बसपाला केवळ २२.२४ टक्के मतं मिळाली. त्यामुळे बसपाच्या १९ जागा कमी झाल्या.
सर्व पक्षांचा दलित मतदारांना पटवण्याचा प्रयत्न!
- पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाटव, खटिक, भुईयार, पासी, वाल्मिकी असे अनुसूचित जातीचे मतदार आहेत.
- त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक मतदार हे जाटव मानले जातात.
- वाल्मिकी, भुईयार हे भाजपाचे मतदार मानले आहेत.
- त्यामुळे यावेळी जाटव सर्वांचे लक्ष्य आहे.
- यावेळीही बहुसंख्य दलित बसपासोबत असण्याची शक्यता असली, तरी भाजपा आणि युतीच्या बाजूने जाणाऱ्यांची संख्याही कमी नसणार.
दलितांचा एक वर्ग असाही आहे जो पर्यायांचा विचार करत आहे. - अशा स्थितीत दलितांना कोणताही एकच पक्ष बांधून ठेवू शकेल, असे नाही.
येथील दलितांचा प्रभाव
- पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशात आग्रा येथे निवडणूक होत आहे.
- येथे विधानसभेच्या एकूण ९ जागा आहेत.
- गेल्या निवडणुकीत भाजपाने येथील सर्व जागा जिंकल्या होत्या.
- गेल्या निवडणुकीतच दलितांनी भाजपाकडे झुकल्याचे बोलले जात आहे.
- हा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
- मात्र, बसपला हे चांगलेच ठाऊक आहे.
- त्यामुळेच मायावतींनी यावेळी आग्रा येथून निवडणुकीचा हंगाम सुरू केला.
- सहारनपूर, बुलंदशहर, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर या जिल्ह्यांमध्येही दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे.