मुक्तपीठ टीम
लसीनंतर आता कोरोनाचे होणार तरी काय, याविषयीच सध्या चर्चा आहे. लसीकरणानंतर कोरोना पूर्णपणे नष्ट होईल का? लसीकरणानंतरसुद्धा कोरोनाचा प्रभाव राहील का? कोरोना कधी संपणारच नाही का? या प्रश्नांविषयी अभ्यास केला गेला आहे. शास्त्रज्ञांनी यावर अभ्यासानंतर आपले मत मांडले आहे.
सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जसजशी माणसांमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत जाईल, तसतसे कोरोनाचे सामान्य रोगात रुपांतर होईल. तो सामान्य तापासारखा उरेल. ताप जसा येतो, जातो. तसेच कोरोनाचे होईल. पण, अद्यापही कोरोना एक गंभीर धोका आहे. हा वायरस थेट मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. जोपर्यंत एखादी व्यक्ती कोरोना झाल्यावर संपूर्ण बरी होत नाही किंवा त्यांना लस दिली जात नाही तोपर्यंत त्याला संसर्गाचा धोका असतोच.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अधिक
६ ते १६ वर्षे वयोगटातील मुले प्रौढांपेक्षा या विषाणूंविरूद्ध लढण्यास अधिक सक्षम आहेत. या वयात रोग प्रतिकारशक्ती वाढत असते म्हणून यावयातील मुलांवर विषाणू तितका परिणाम करत नाही. परंतु हा विषाणू ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. कोरोनाची लक्षणे ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक आढळतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना प्रभाव कमी होण्यास आणखी काही वर्षे लागतील. लसीशिवाय हे शक्य नाही.
कोणत्या कोरोना विषाणूंमुळे सर्दी होते?
संशोधक डॉ. फेलो जेनी लेविन यांनी ६ प्रकारच्या कोरोनव्हायरसची तपासणी केली. त्यामध्ये ४ व्हायरस असे आहेत, ज्यामुळे सर्दी होते. कोरोनाच्या सार्स आणि एमईआरएस विषाणूंमुळे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. हे दोन्ही विषाणू लोकांमध्येही फारसे पसरले नाहीत. जेनी यांचे म्हणणे आहे की, कोरोना कमी होण्यास किती वेळ लागेल हे विषाणूचा प्रसार आणि लस घेण्याच्या गतीवर अवलंबून असेल.
कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाद्वारे रोग प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, “लसीद्वारे लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवली जाऊ शकते. यासाठी लसीकरण कार्यक्रम वेगाने करणे आवश्यक आहे. याद्वारे कोरोना प्रभाव कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे धोकाही कमी होईल. कदाचित संपेलही.”
जर लस विषाणूच्या संसर्गास संपूर्णपणे रोखू शकली तर ती चांगली गोष्ट होईल. आत्ता ही लस आपल्याला संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते आहे. परंतु संसर्ग पूर्णपणे पसरण्यापासून रोखत नाही. प्रत्येक व्यक्तीला लस लावल्यास विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता वाढेल.