Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते झाले निर्णय?

April 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Cabinet Decision 31-03-2022

मुक्तपीठ टीम

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पार पडली. या बैठकीत दहा निर्णय घेण्यात आले. ते नेमके कोणते निर्णय आहेत, याची खातेनिहाय दिलेली विस्तृत माहिती पुढील प्रमाणे आहे.

मंत्रिमंडळ बैठक : दि. ३१ मार्च २०२२

एकूण निर्णय- १०

निर्णय- १

खाते – वैद्यकीय शिक्षण विभाग

हाफकीन येथील कोवॅक्सिन लस उत्पादनाला वेग देणार

Image

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने कोवॅक्सिन लस उत्पादित करण्याच्या प्रकल्पास अर्थसहाय्य करण्यास व उत्पादनाच्या तंत्रज्ञानातील काही आवश्यक बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रकल्पाशी निगडीत काही प्रारंभिक कार्ये पूर्ण केलेली आहेत. परंतु प्राथमिक टप्प्यावर प्रकल्प राबविताना मेसर्स भारत बायोटेक यांचेकडून महामंडळास प्राप्त होणाऱ्या उत्पादन तंत्रज्ञानातील बदल व त्याअनुषंगाने उत्पादित स्थापित क्षमतेमध्ये (Installed Capacity) बदल, मेसर्स भारत बायोटेक यांच्या उत्पादन तंत्रज्ञानाशी निगडीत सुसंगत समर्पित आवश्यक सुविधा उभारणी, हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था यांची BSL-३ प्रयोगशाळा उन्नतीकरण, कर व इतर बाबी यांचा अंतर्भाव करताना  प्रकल्पाच्या मूळ मंजूर रक्कमेमध्ये झालेली वाढ, प्रकल्पाच्या मूळ अंदाजपत्रकामध्ये झालेल्या  सुधारणांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात cell factory based उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत ११० दशलक्ष डोसेस समान कोव्हॅक्सीन Drug Substance उत्पादनासाठी १२६.१५ कोटी रुपये इतक्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असून यामध्ये केंद्र शासनाचा १०.०७ कोटी रुपये व राज्य शासनाचा 56.08 कोटी रुपये इतका हिस्सा आहे. यामध्ये हाफकिन प्रशिक्षण,संशोधन व चाचणी संस्था, मुंबई या संस्थेस BSL-२/३ प्रयोगशाळा उन्नतीकरण, प्रशिक्षण व चाचणी क्षमता वृद्धी इ. संबधित बाबीसाठी १०.१९ कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही हाफकिन महामंडळाकडून करण्यात येणार आहे.  सदर बैठकीत या प्रकल्पाची उभारणी जलद गतीने होणेसाठी यापुर्वी गठीत करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीस प्रकल्पाशी संबंधीत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारही प्रदान करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

निर्णय- २

गृह विभाग

बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार

Image

राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

हे खटले मागे घेण्यासाठी खालील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बैलगाडी शर्यतीच्या घटनेत जिवीत हानी झालेली नसावी, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाखापेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे, या खटल्यांवर पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रिय समिती कडून निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेमध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या खटल्यांमध्ये विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा समावेश आहे, असे खटले उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्याला अनुसरुन विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा ज्या खटल्यात समावेश आहे ते खटले मागे घेणे योग्य असल्याचे क्षेत्रिय समितीचे मत झाल्यास समितीने त्याबाबत शिफारस करुन उच्च न्यायालयाकडे तशी विनंती करण्यास मान्यता देण्यात आली.

निर्णय- ३

ग्रामविकास विभाग

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राज्य योजना म्हणून राबविणार

Image

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही बंद करण्याऐवजी १०० टक्के राज्य योजना म्हणून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

केंद्र शासनाने दि. १ एप्रिल २०२२ पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन निधीतील केंद्राचा ६० टक्के वाटा  देणे बंद केल्याने सदर योजना १०० टक्के राज्य पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यास मंजुरी देण्यात आली.  प्रत्येक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस १५ पदांऐवजी ८ पदांचा आकृतीबंध असेल.

निर्णय- ४

ग्रामविकास विभाग

राज्यात मिशन महाग्राम राबविण्यास मान्यता

Image

ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या हेतूने राज्यात ‘मिशन महाग्राम’ २०२२ ते २०२५ या कालावधीत राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मिशन महाग्रामअंतर्गत मानव विकासाच्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून विकासाचे शाश्वत ध्येय साध्य करण्यासाठी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल. देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांसोबत बहुआयामी भागीदारी विकसित करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.

निर्णय- ५

विधि व न्याय विभाग

१४ कौटुंबिक न्यायालयांना कायमस्वरुपी मान्यता

Image

राज्यात १४ व्या वित्त आयोगांतर्गत पाच वर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या १४ कौटुंबिक न्यायालयांना  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कायमस्वरुपी मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे पाहता तसेच या न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात वाढ झाल्याने न्यायालयातील प्रकरणांची संख्या वाढली आहे हे पाहता हा निर्णय घेण्यात आला.

लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, सांगली, रायगड अलिबाग, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, सातारा, धुळे, बुलढाणा, भंडारा अशी मान्यता देण्यात आलेली १४ कौटुंबिक न्यायालये आहेत.

निर्णय- ६

विधि व न्याय विभाग

१०० जलदगती न्यायालयांना पाच वर्षांची मुदतवाढ

Image

जलदगती न्यायालयांची आवश्यकता आणि उपयोगिता लक्षात घेता १०० जलदगती न्यायालयांना १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या न्यायालयांकरिता जिल्हा न्यायाधीश व कर्मचारी अशी ५०० पदे पुढे चालू ठेवण्यास देखील मान्यता देण्यात आली. यासाठी २६८ कोटी ५७ लाख इतका खर्च येईल.

या न्यायालयांमध्ये प्रामुख्याने मागासवर्गींयांवरील अत्याचाराची प्रकरणे, महिलांवरील अत्याचार व बलात्काराची प्रकरणे, भ्रष्टाचार, मोटार अपघात, न्यायालयीन बंदी, भूसंपादन यासारखी गंभीर स्वरुपाची प्रकरणे चालवली जातात. राज्यात एप्रिल २००१ पासून १८७ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली होती. २०१७ ते २०२१ या कालावधी मध्ये या न्यायालयांमधून सुमारे १ लाख ३२ हजार ६२१ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

निर्णय- ७

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

Image

राज्यातील ४० ते ५० वर्ष या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा तर ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा आणि त्यासाठी ५ हजार रुपये इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या निर्णयानुसार ४० वर्षांवरील वयाच्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकीय तपासण्या, ठरवून दिलेल्या नमुन्यात, त्या-त्या आर्थिक वर्षात करून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठीच्या खर्चाची आवश्यक रक्कम संबंधित रुग्णालयाला प्रथम स्वत: अदा करावी व त्याची प्रतिपूर्ती आपल्या कार्यालयातून मिळवावी लागणार आहे.

राज्यातील वय वर्ष ४० पुढील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकिय चाचण्या सर्व शासकीय वैद्यकिय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत करता येईल. यापैकी काही चाचण्या उपरोक्त संस्थामध्ये उपलब्ध नसल्यास अशा चाचण्या तालुका स्तरावर बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती वेगळयाने निश्चित केली जाईल. यासाठी प्रतिवर्षी एकूण १०५.४३ कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात ४० ते ५० वर्षे वयोगटात एकूण १ लाख ५४ हजार २५५ व ५१ वर्षावरील वयोगटात १ लाख ३३ हजार ७५० असे दोन लाख 88 हजार इतके अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

निर्णय- ८

वैद्यकीय शिक्षण विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७व्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू

Image

शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक, तसेच अधिष्ठाता, सह संचालक व संचालक या संवर्गाना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसीनुसार ७ व्या वेतन आयोगातील वेतनविषयक तरतुदी २०१९ मध्ये  लागू  करण्यात आल्या आहेत. व्यवसायरोध भत्ता, पदव्युत्तर भत्ता, विशेष भत्ता, अतिरिक्त वेतनवाढी व करिअर एडव्हान्समेंट स्किम भत्ते सुधारित दराने लागू करण्यात येतील.  हे भत्ते लागू करण्यासाठी अंदाजे १०३ कोटी, ९५ लाख, ९७ हजार इतका खर्च येईल.

राज्यातील वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यंत नेण्यासाठी २०३५ पर्यंत राज्यात निर्माण होणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा विचारात घेवून, प्रशिक्ष‍ित व अर्हताधारक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी विविध उपाययोजना करणे व त्यांना संशोधन भत्ता, जोखीम भत्ता तसेच अन्य कोणते अनुषंगीक भत्ते लागू करता येतील याबाबत अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली.

निर्णय- ९

वित्त विभाग

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ

Image

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत १ एप्रिल पासून सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

एस-२० व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात ५४०० रुपये व इतर ठिकाणी २७०० रुपये, एस-७ ते एस-१९ स्तरासाठी अनुक्रमे २७०० व १३५० रुपये,  एस-१ ते एस-6 स्तरासाठी १००० व ६७५ रुपये. उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तरामधील २४ हजार २०० रुपये व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना २७०० रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना १३५० रुपये इतका वाहतूक भत्ता मिळेल.

तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पिडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर /श्रवणशक्तीतल दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे वाहतूक भत्ता राहील. एस-२० व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात १० हजार ८०० रुपये व इतर ठिकाणी ५४०० रुपये, एस-७ ते एस-१९ स्तरासाठी अनुक्रमे ५४०० व २७०० रुपये,  एस-१ ते एस-६ स्तरासाठी २२५० व २२५० रुपये अशी सुधारणा असेल. एस-१ ते एस-६ या वेतन स्तरामधील २४ हजार २०० व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना ५४०० रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना २७०० रुपये इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील. यासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

निर्णय- १0

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

अशासकीय अनुदानित कला शिक्षकांना विविध लाभ

Image

अनुदानित कला संस्था कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुती रजा, “कॅन्सर” “पक्षाघात” झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती यासंदर्भातील तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत हे लाभ देण्यात येतील.


Tags: ajit pawaramit deshmukhbalasahebh thoratCabinet decisionhasan mushrifMaharashtrauday samantमंत्रिमंडळ निर्णयमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

महाराष्ट्रात सीएनजी ६ रुपयांनी, तर घरातील पाइप गॅस ३.५० रुपयांनी स्वस्त!

Next Post

यूपीएससी मेन्स परीक्षा: सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा देणारा निर्णय!

Next Post
supreme court

यूपीएससी मेन्स परीक्षा: सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा देणारा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!