मुक्तपीठ टीम
आता राजकारणी, व्यावसायिक, पत्रकार यांच्याप्रमाणेच वकिलांनाही ईडीची पिडा बाधू लागली आहे.
नागपुरातील चर्चेत असलेले वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी सकाळी छापा मारून चौकशी केल्यानंतर ईडीचे पथक अॅड. सतीश उके यांना सोबत घेऊन गेले आहे. अॅड. उके हे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल केल्यामुळे चर्चेत आले. मात्र, बरीच वर्षे चाललेल्या त्या प्रकरणापेक्षाही मधल्या काळातील नाना पटोलेंच्या गावातील ‘मोदी’ नावाच्या कथित गुंडाचे प्रकरण त्यांना जास्त नडल्याची शक्यता जास्त चर्चा आहे. त्या गुंडाने केलेली वक्तव्यं ही माध्यमांमधून खूप प्रसारीत झाली. त्यामुळेच अॅड. उकेंकडे गल्ली ते दिल्ली लक्ष गेले असण्याची शक्यता सांगितली जाते. त्यातूनच मग आता जे जमीनीचे प्रकरण सांगितले जाते ते मुद्दा ठरले असावे, अशी शक्यता आहे.
सकाळी सकाळीची उकेंच्या घरी ईडी!
- नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला.
- आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली.
- ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी होते.
- यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
- नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती.
- या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल होते.
- तसेच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते
- तब्बल सहा तास ही छापेमारी सुरु होती.
- त्यानंतर ईडीचे पथक अॅड. सतीश उके यांना सोबत घेऊन गेले.
फडणवीस निवडणूक याचिका प्रकरण काय होतं?
- देवेंद्र फडणवीस यांच्यावर २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला होता.
- या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
अॅड. सतीश उके, नाना पटोले आणि ‘तो’ कथित मोदी!
- महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गावातील लोकांशी बोलताना मोदींबद्दल गैरउद्गार काढल्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती.
- त्यानंतर एका मोदी असं कथित टोपणनाव असलेल्या गावगुंडाला उभं करुन सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
- त्या गावगुंडाला मोदी का म्हटलं जातं ते अगदी सविस्तरपणे गावगप्पांसारखं रंगवून सांगण्यात आलं.
- माध्यमांनीही त्याला एखाद्या मोठ्या माणसासारखं खोदून खोदून विचारत ते सारं दाखवलं.
- पण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाही तर त्या गावगुंडाबद्दलच नाना पटोले बोलले होते, असे मांडलं गेलं.
- त्यांची कायदेशीर कारवाईतून सुटका झाली.
- मात्र, त्यातून अॅड.सतीश उके यांचं नाव भलतंच चर्चेत आलं.
- भाजपा वर्तुळातील अनेकांनी त्यावेळीही त्या कथित मोदीच्या प्रकरणाविषयी नापसंती व्यक्त केली होती.
- त्याला पंतप्रधानांविषयी गैरउद्गाराच्या कारवाईतून सुटका करण्यासाठी उभे करत पुन्हा त्याला मोदी का बोलतात, ते सांगत बदनामी घडवली गेली, असा आक्षेपही होता.
- त्यात आता त्यांनी घेतलेली आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधातील नाना पटोलेंचा खटलाही आता नव्यानं चर्चेत आला आहे.
कोण आहेत ॲड. सतीश उके?
- ॲड.सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत.
- सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात.
- ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती.
- उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती.
- ॲड. सतीश उके यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते.
- सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती.