मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समुहाने काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्येही पदार्पण केले आहे. गौतम अदानी यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीतील २९.१८ टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड हा करार करणार आहे. अदानी ग्रुपकडून मीडिया हाऊसमध्ये २६ टक्के स्टेकसाठी खुली ऑफरही सुरू करणार आहे. एकप्रकारे एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल अदानी ग्रुपच्या हाती जाताना दिसत असताना काहींनी लोकाभिमुख पत्रकारितेसाठी ओळखले जाणाऱ्या रविश कुमारांनी एनडीटीव्ही सोडल्याच्या अफवाही सुरु झाल्या. मात्र, खुद्द रविश कुमारांनी त्या फेटाळून लावल्या आहेत. दुसरीकडे एनडीव्हीचे सर्वेसर्वा प्रणॉय राय, राधिका रॉय यांनी त्यांच्यावरील सेबीच्या व्यवहार बंदीची माहिती देत अदानींशी व्यवहार शक्य नसल्याचे कळवलं आहे.
भागिदारांना २९४ रुपये प्रतिशेअर्स देण्याचा प्रस्ताव!!
- ही खुली ऑफर यशस्वी झाल्यास, अदानी समूहाची ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक भागीदारी असेल.
- यासह हा समूह NDTV चा बहुसंख्य भागधारक बनेल.
- विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या अदानींच्या उद्योग समुहातील एएमएनएलच्या उपकंपनी द्वारे एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांची कंपनी आरआरपीआर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ९९.५ टक्के इक्विटी शेअर्स विकत घेण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एनडीटीव्हीमध्ये २६ टक्के भागिदारी खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर!!
- एएमएनएल, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि वीसीपीएलकडून एनडीटीव्हीमध्ये २६ टक्के भागिदारी खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर आणली जाणार आहे.
- सेबीच्या नियमांचं पालन करण्यासाठी हे केलं जाणार आहे.
- एनडीटीव्हीचे इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी भागिदारांना २९४ रुपये प्रतिशेअर्स देण्याचा प्रस्ताव अदानी समुहाकडून देण्यात आला आहे.
- AMNL आणि Adani Enterprises सोबत VCPL NDTV च्या अतिरिक्त १६,७६२,५३० शेअर्ससाठी (२६ टक्के) खुली ऑफर आणणार आहेत.
- शेअर्सची खुली ऑफर किंमत २९४ रुपये आहे.
- एनडीटीव्हीमध्ये प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांची सर्वाधिक भागीदारी आहे. दोघांकडे एकूण ३२.२६ टक्के हिस्सा आहे.
रविश कुमारांनी एनडीटीव्ही सोडल्याच्या अफवा आणि इंकार!
आपल्या लोकाभिमुख पत्रकारितेसाठी ओळखले जाणाऱ्या रविश कुमारांना अदानींसारख्या भांडवलदाराने चॅनल ताब्यात घेणे रुचणारे नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची अफवा पसरली. स्वत: रविश कुमारांनी ट्वीटद्वारे त्या अफवेला फेटाळले.
रविश कुमारांचे ट्वीट
आदरणीय लोक,
माझ्या राजीनाम्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मुलाखत देण्यास होकार दिल्याच्या अफवेसारखा आहे आणि अक्षय कुमार गेटवे ऑफ इंडियावर आंबे घेऊन माझी वाट पाहत आहे, या अफवेसारखंच!
तुमचाच,
रवीश कुमार,
जगातील पहिला आणि सर्वात महागडा शून्य टीआरपी अँकर
माननीय जनता,
मेरे इस्तीफ़े की बात ठीक उसी तरह अफ़वाह है, जैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुझे इंटरव्यू देने के लिए तैयार हो गए हैं और अक्षय कुमार बंबइया आम लेकर गेट पर मेरा इंतज़ार कर रहे हैं।
आपका,
रवीश कुमार,
दुनिया का पहला और सबसे महँगा ज़ीरो टीआरपी ऐंकर— ravish kumar (@ravishndtv) August 24, 2022
प्रणॉय रॉय, राधिका रॉय यांच्यावरील सेबी बंदीचा अदानींना अडथळा?
आजच्या ताज्या घडामोडीनुसार, अदानी समूहाला नवी दिल्ली टेलिव्हिजन लि. कडून एक पत्र प्राप्त झाले आहे की अदानी समूह RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मधील 99.5% स्टेक घेण्यास असमर्थ आहे. कारण भारताच्या बाजार नियामक सेबीने कंपनीचे सध्याचे मालक राधिका आणि प्रणॉय रॉय यांना कोणत्याही सिक्युरिटीज व्यवहारांसाठी मनाई केली आहे. त्यामुळे अदानींशी व्यवहार शक्य नाही. एक प्रकारे न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडला ताब्यात घेण्याच्या अदानींच्या प्रयत्नांमध्ये हा मोठा अडथळा आहे, असे दिसते.