मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये एक शब्द सातत्याने कानी येतोय तो प्लाझ्मा हा. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी महत्वाची ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्लाझ्माच्या मागणीत वाढ होत आहे. कोरोनातून बरे झालेले अनेक डॉक्टर असो वा सेलिब्रिटी प्लाझ्मा दान करुन इतरांनाही मदत करण्याचे आवाहन करीत असतात. त्यामुळे आज प्लाझ्माबद्दलच माहिती घेवूया.
प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय?
• आपल्या रक्तामध्ये लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि पिवळा द्रव भाग असतो.
• पिवळ्या द्रव भागाला प्लाझ्मा असे म्हटले जाते, ज्यातील ९२ टक्के हिस्सा पाण्याचा असतो.
• पाण्याव्यतिरिक्त प्लाझ्मामध्ये प्रोटिन, ग्लूकोज मिनरल, हार्मोन्स, कार्बन डाय ऑक्साईड असतात.
• आपल्या शरीरातील रक्तामध्ये सुमारे ५५ टक्के भाग हा प्लाझ्माचा असतो.
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
• प्लाझ्मा थेरपीला कॉन्व्लेसेन्ट प्लाझ्मा थेरपी असेही म्हटले जाते.
• यात कोरोनातून बरे झालेल्यांच्या शरीरातून प्लाझ्मा काढून तो कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात इंजेक्शनच्या मदतीने इंजेक्ट केला जातो.
• कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने तो प्लाझ्मा संसर्गित रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो.
• परंतु अद्याप प्लाझ्मा थेरपीने कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होतात हे सिद्ध झालेले नाही.
• पण यावर केलेल्या अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, या थेरपीमुळे रुग्णांची कोरोना विषाणूंशी लढण्याची शक्ती वाढते.
कोण करु शकतो प्लाझ्मा दान?
• केंद्र सरकारने प्लाझ्मा दानासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
• कोण प्लाझ्मा दान करु शकतो, याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
• कोरोना रुग्णांना आवश्यक असलेला प्लाझ्मा हा कोरोनामुक्त झालेल्यांचाच उपयुक्त असतो.
• प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असणारे कोरोना निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.
• ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, अशा लोकांना २८ ते ३० दिवसानंतर प्लाझ्मा दान करता येतो.
• ज्यांचे वय १८ वर्षे आहे आणि जे पूर्णपणे निरोगी आहेत असे लोक प्लाझ्मा दान करु शकतात.
• ६० वयापर्यंतचे निरोगी व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात.
कोण प्लाझ्मा दान करु शकत नाही?
• गर्भवती महिला प्लाझ्मा दान करु शकत नाहीत.
• मधुमेह, कर्करोग तसेच इतर व्याधीग्रस्त असणारे लोक प्लाझ्मा दान करु शकत नाही.
• तसेच उपचार सुरु असणारे लोक प्लाझ्मा दान करु शकत नाही.
• ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणारे प्लाझ्मा दान करु शकत नाहीत.