मुक्तपीठ टीम
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने निवडणूक होणार आहे. शिवसेनेनचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्या लढतीमुळे राज्याच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द वेळोवेळी ऐकू येत आहे. त्यात आता विधानपरिषदेसाठी भाजपाने संख्याबळावर निवडून येतील त्यापेक्षा दोन उमेदवार जास्त उभे केल्याने त्याही निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर घोडेबाजार म्हणजे काय, राजकारणात त्याचा अर्थ काय आणि राजकारणात हा शब्द कधीपासून सुरू झाला,हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
घोडे बाजार या शब्दाचा अर्थ जाणून घ्या…
- हॉर्स ट्रेडिंग हा शब्द प्रथम केंब्रिज शब्दकोशात समाविष्ट करण्यात आला.
- जिथे या शब्दाचा अर्थ पडद्यामागील दोन पक्षांमधील असा संवाद होता, ज्यामध्ये दोघांचा फायदा होईल.
- १८ व्या शतकात घोड्यांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडून हॉर्स ट्रेडिंग या शब्दाचा वापर करण्यात आला .
- १८२० च्या दरम्यान व्यापारी उच्च जातीच्या घोड्यांची खरेदी विक्री करत होते.
- आपले घोडे विकले जावेत, चांगल्या जातीचे घोडे विकत घेता यावेत तसेच या खरेदी विक्रीतून चांगला नफा मिळावा म्हणून हे व्यापारी काही ना काही जुगाड करायचे.
- त्यालाच पुढे हॉर्स ट्रेडिंग संबोधले जाऊ लागले.
- या काळात व्यापारी या घोड्यांना कुठे तरी लपवत असत. किंवा कुठे तरी बांधत असत.
- किंवा योग्य ठिकाणी त्यांची रवानगी करत असत. त्यानंतर चलाखीने अधिकाधिक नफा घेणारा आर्थिक व्यवहार करूनच या घोड्यांची विक्री करत असत.
भारतीय राजकारणात घोडेबाजार कधीपासून?
- भारतीय राजकारणात १९६७ पासून घोडे बाजाराला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.
- ऑक्टोबर १९६७ मध्ये, हरियाणाचे आमदार गयालाल यांनी १५ दिवसांत तीनदा पक्ष बदलला.
- अखेरीस तिसऱ्यावेळी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले.
- त्यावेळी काँग्रेस नेते विरेंद्र सिंह यानी पत्रकार परिषद घेऊन आया राम गया राम’ विधान केले होते.
भारतीय राजकारणात याचा अर्थ काय?
खरंतर, भारताच्या राजकारणात हा शब्द खासदार आणि आमदारांना प्रलोभनाशी जोडून वापरला जातो.
जेव्हा खासदार किंवा आमदार काही फायद्यासाठी किंवा सरकार अस्थिर करण्यासाठी बाजू बदलतात तेव्हा त्याला घोडेबाजार म्हणतात.
घोडेबाजार कधी होतो?
- खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यच नव्हे तर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांच्याबाबतीतही असे घोडेबाजार त्या त्या स्तरावर झाल्याच्या चर्चा आजवर अनेकदा रंगल्या आहेत.
- विशेषत: सत्तेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा एखाद्या पक्षाकडे नसेल किंवा अगदी काठावरचे बहुमत असेल तेव्हा विरोधातील किंवा काठावरच्या लोकप्रतिनिधींना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष, राजकीय नेते किंवा काहीवेळा राजकीय दलाली करणारे पॉवर ब्रोकर घोडेबाजारात सहभागी होतात.
- विधान परिषद, राज्यसभा अशा अप्रत्यक्ष निवडणुकांनी निवड होणाऱ्या निवडणुकांमध्येही घोडेबाजार होतो.
- या निवडणुकांमध्ये मतदार असणाऱ्या लोकप्रतिनिधींचा एक कोटा ठरलेला असतो, तो जर कमी असेल किंवा त्यात अटीतटीची लढत असेल घोडेबाजार अधिकच रंगतो.
- थेट कोणीही मान्य करत नसलं तरी घोडेबाजारात राजकीय घोड्यांचे भाव हे काही लाखांपासून ते कोटींपर्यंत त्या त्या राजकीय गरजेवर ठरतात. स्थानिक स्तरावर ते खूपच कमी म्हणजे हजारांमध्येही असू शकतात.
- काहीवेळा काही लोकप्रतिनिधी थेट रोख रक्कम न घेता काही कामांच्याबदल्यात मदत करतात.