मुक्तपीठ टीम
एकीकडे शरद पवारांना देशातील मोठे नेते म्हणणारे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत तर दुसरीकडे “शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म!” असे जाहीररीत्या फटकारणारे शिवसेनेचेच नेते माजी खासदार अनंत गीते! “एक नेता, एक आवाज म्हणजे एक शिवसेना” असे मानल्या जाणाऱ्या शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही पुणे जिल्ह्यातील खेड मतदारसंघातूनही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल वेगळे उद्गार काढणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादीविरोधात आवाज उठवला गेला होता. आणि संजय राऊतांनी शरद पवारांचे आशीर्वाद असल्याच्या कोल्हे यांच्या वक्तव्याला साथ दिली होती. अनंत गीते असो वा शिवाजीराव आढळराव पाटील ते उघडपणे बोललेत पण राज्यभरात स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष हा होतच आहे. त्यातूनच गीतेंसारख्यांकडून टोकाचे रोखठोक उद्गार काढले जात आहेत. तसाच प्रकार राष्ट्रवादीतील आमदार मोहित, खासदार कोल्हे यांच्यासारख्यांकडूनही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कमी लेखत घडत आहे. हे नेमकं का घडतंय ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
रायगडमधून अनंत गीतेंचा राष्ट्रवादीवर हल्ला बोल
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी राष्ट्रवादी- काँग्रेसवर आणि शरद पवारांवर निशाना साधला आहे.
अनंत गीते नेमकं काय म्हणाले?
- मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय.
- शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे.
- आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत.
- पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे.
- शिवसेनेचं नाही.
- सरकार आघाडी सांभाळेल.
- सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील.
- तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे.
- आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही.
- आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे.
राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून!
- दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते.
- यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती.
- दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही.
- ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे.
- दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही.
आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे!
- दुसरा कुठलाही नेता त्याला कुणीही किती उपाधी देवो, कुणी जाणता राजा बोलो.
- कुणी आणखी काय म्हणो… पण आणचे गुरू तो होऊ शकत नाही.
- आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत.
- ही आघाडी केवळ सत्तेची तडजोड आहे.
- ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुम्ही आपल्याच घरी येणार.
- आपलं घर भक्कम करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवायची आहे.
अनंत गीते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते
- अनंत गीते हे हाडाचे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
- मुंबईतील अंधेरी पश्चिम विभागातील प्रभागातून ते मुंबई मनपावर निवडून जात असत.
- साधे राहणीमान पण शिवसेनेसाठी वाट्टेल ते करण्याच्या आक्रमक वृत्तीमुळे ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या विश्वासातील होते.
- त्यांच्यावर त्यावेळी मुंबई मनपाच्या स्थायी समितीचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
- २०१४ मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते.
- मात्र २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले होते.
- रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते.
- मात्र, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला.
शिवसेना – राष्ट्रवादी म्हणजे एका म्यानातील दोन तलवारी!
- शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते त्यातही संजय राऊत कितीही ठासून सांगत असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सख्य नाही.
- शिवसेना भाजपासोबत युतीत लढताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेससोबत आघाडीत लढताना दोन्ही पक्षांचे वाट्याला येणाऱ्या बहुसंख्य मतदारसंघांमध्ये परस्परांशी सामना होत असे.
- उदाहरणार्थ रायगड मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी लढत होत आली. तर पुण्यातील मावळ, शिरुर या दोन मतदारसंघांमध्येही या दोन पक्षातच लढत होत असे.
- आमदारकीच्या विधानसभा मतदारसंघांमध्येही अशीच स्थिती आहे.
- त्यामुळे प्रादेशिक बाज असणाऱ्या दोन्ही पक्षांचा अपेक्षित मतदार हाही बऱ्याच प्रमाणात समान आहे.
- स्थानिक पातळीवर आपले हित जपण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये आजही स्पर्धा असतेच असते.
- त्यातूनच मग परस्परांच्या जिल्हा पालकमंत्र्यांकडून, मंत्र्यांकडून डावलले जात असल्याच्याही तक्रारी नेहमीच होत असतात.
- स्थानिक पातळीवरील याच संघर्षाचा स्फोट आढळराव पाटलांनंतर आता अनंत गीतेंच्या तोंडून झाला आहे. भविष्यात असे स्फोट होतच राहतील.