मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमारी रंगणार आहे. मात्र, त्या आधीच तृणमूल काँग्रेस पक्षामधील बंडखोरीसाठी राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर हे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सुवेंद्र अधिकारी असो वा शीलभद्रा हे टीएमसीमधून वेगळे होण्याचे मुख्य कारण प्रशांत किशोर यांचा वाढता हस्तक्षेप असल्याचे मानले जात आहे.
आता टीएमसी पक्षात तिकिट वाटपासंबंधितही उपयेगात आणलेली रणनीतीमुळे खळबळ उडाली आहे. ‘तिकिट वाटपामागील निकष काय होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न उपस्थित होण्याचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या अगदी जवळील सहकारी सोनाली गुहा यांना तिकिट न देणे हा आहे. सोनाली गुहा या चार वेळा आमदार राहिल्या आहेत. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिट वाटपाच्या धोरणावर चिडून सोनाली गुहा यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दर्शविला आहे.
टीएमसी सोडत भाजपचा झेंडा फडकवणाऱ्या शीलभद्र दत्ता बॅरेकपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, “प्रशांत किशोर येताच ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना खुर्चीवर बसविण्याचा प्रयत्न सुरु केले. प्रशांत किशोर हे इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालचादेखील विचार करीत आहेत, तर ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. प्रशांत किशोर हे पक्षामधील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवतात. त्यामुळेच पक्षांतर्गतच कलह वाढला आहेत”.
दरम्यान, अलिकडेच पश्चिम बंगालचे नेते आणि खासदार दिनेश त्रिवेदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सोडचिट्टी दिली. त्यांनीही प्रशांत किशोरांवर नाराजी व्यक्त केली होती.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे विशाल सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस डाव्या आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे, महागड्या एलपीजी सिलिंडरच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एक पदयात्रा काढली. या पदयात्रेत ममता यांनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.