मुक्तपीठ टीम
तुम्हाला सतत दम लागतो? अनेकदा डोकेदुखी उद्भवते किंवा कोणतेही काम करताना थकवा येतो. जर दररोज या समस्येचा सामना करीत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर शरीरात कोणताही गंभीर आजार असेल तर त्याची लक्षणे ही आधीच दिसू लागतात.
पुढील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
१. सतत थकवा येणे
जर सतत थकवा जाणवत असेल तर झोपेमुळे हा थकवा जाणवत आहे असे मानू नका. हे यकृत निकामी होणे, अशक्तपणा, कर्करोग, क्रॉनिक संसर्ग, मधुमेह इत्यादींचे लक्षण देखील असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
यावर उपाय
सर्वप्रथम, खाण्याच्या सवयीत सुधारणा करा. वेळेवर जेवण करा. पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खा. दररोज नियमित व्यायाम करा. रात्री उशिरापर्यंत जागू नका. दररोज ७ ते ८ तास झोप घ्या. याशिवाय जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. आणि हे सर्व करूनही समस्या कायम राहिल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२. दम लागणे
जर थोड्या पायऱ्या चढताच किंवा चालल्यावर दम लागत असेल तर, हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्यां असू शकतात. या व्यतिरिक्त, दमा, रक्तदाब किंवा फुफ्फुसातील रक्त गाठी या आजारांची ही लक्षणे असू शकतात.
यावर उपाय
जर ही लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम आपले वजन कमी करा. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते थांबवा. नियमितपणे व्यायाम करा, विशेषत: प्राणायाम सारख्या श्वासाशी संबंधित योग करा. परंतु, सर्व काही करूनही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.