डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. इथे आलेला प्रत्येक जण या आनंदात न्हाऊन जातो. ज्याच्या भेटीला जायाचे तो विठूराया आनंदकंद आहे. त्याचे जे अधिष्ठान आहे ते आनंदवन भुवन आहे. ज्या मार्गाने वारकरी मार्गक्रमण करतात तो आनंदाचा राजमार्ग आहे. आणि या मार्गावरील सगळे जन आनंदयात्री आहेत. दाता असो वा घेता दोघांनाही या देण्याघेण्यात समाधान आहे.
दुसऱ्याला देण्यातही एक सुख आहे. कविवर्य विंदा करंदीकरांनी आपल्या कवितेत शेवटी ‘घेणाऱ्याने घेत घेता, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ असे म्हटले आहे. याला कविकल्पना म्हटले तरी दिंडीच्या मार्गावर प्रत्येक जण हे वाक्य जगत असतो. दिंडीमध्ये जमलेला जनसमुदाय मोठ्या आशेने आलेला असतो. यात सगळ्या प्रकारचे लोक असतात. अगदी खिसेकापू सुद्धा वर्षातून एकदा होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने वाट पहाट असतात. इथे नित्य नेमाच्या गरजा भागवताना नाकी नऊ येणारी मंडळी कशाला हो खिशात जास्त पैशे बाळगणार आणि खिशांतले पाकीट चोरीला गेले तरी चोराचे (विश्वाचे म्हणजे पर्यायाने चोराचे) भले होवो अशीच प्रार्थना करणार.
अन्नदान हे श्रेष्ठ दान, हा पगडा हल्ली आपल्या समाजावरही फिट बसायला लागला आहे. त्यामुळे पुण्य कमवायची संधी मिळताच अनेक दानशूर मंडळी आपसूकच पुढे होतात, पुढाकार घेऊन अन्नछत्र उघडतात आणि आपल्या पदरात पुण्याचे माप पाडून घेतात. वारीच्या बाबतीत मात्र थोडेसे वेगळे आहे. विठ्ठलाच्या वारीला जाणारा प्रत्येक वाटसरू म्हणजे माऊली आहे अशी सगळ्यांची ठाम समजूत आहे. त्यामुळे या माऊलीची जशी जमेल तशी सेवा करायला या मार्गावर अनेक जण पुढे येतात. जितके लोक तितक्या प्रकृती हा प्रकृतीचा नियम का आहे याचे प्रत्यंतर या लोकांनी केलेले दान पाहून येते.
दिंडी मार्गावरून सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच चालणाऱ्या माणसांची वर्दळ चालू असते. नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही दिंडी, दिवस उजाडायच्या आत पुढच्या मुक्कामाला पोहोचल्या असतात. त्यांच्यामागे परचुरन पुण्य कमवायला आलेला वारकरी असतो. यांच्या रहाण्या खाण्याची कोणतीच ठोस व्यवस्था नसते. ‘ज्याने चोच दिली, तो दाणा देणारच’ या वाक्यावर त्याचा भरोसा असतो. त्याला या वीस दिवसात दाण्याबरोबर आपसुकच निवाऱ्याचीही सोय होते.
दिंडी मार्गावरील गावकऱ्यांनाही पक्के माहिती असते. खरा वारकरी त्यांच्या कोणत्याही वस्तुला स्पर्शही करणार नाही. जी काही सेवा करायची ती या किंचित भक्तांची करायची, याचे त्यांना पूर्ण भान असते. या कारणाने नगारखाना त्यांच्याजवळ पोहोचेपर्यंत त्यांचा कारभार उरकलेला असतो.
देणारा प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे देत असतो. कधी दोनचार जण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर दान देतात. बहुतांशी सकाळच्या वेळेला अनेक ठिकाणी चहा आणि नाश्ता दिला जातो. कधी शिरा, कधी उपमा तर कधी पोहे अधूनमधून कोणाला हुक्की आली तर बटाटे वडेही वाटतात. मुंबईचा एक आठ-दहा जणांचा ग्रुप दरवर्षी एका ठराविक ठिकाणी थंडगार मसाले दूध वाटतात. मुंबईवरून रेफ्रीजरेटेड ट्रकमध्ये एनर्जी किंवा त्यासारखे बाटलीतले थंडगार दूध वाटण्याचा त्यांचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालू असतो. सुरुवातीला दोन वर्ष या आणलेल्या बाटल्या रस्त्याच्या कडेला पडून होणाऱ्या दुखपतींचे प्रमाण लक्षात येताच त्यावर त्यांनी त्यांच्यापरीने उपाय शोधून काढला. फुकटच्या मिळणाऱ्या या दुधाची चटक आताशा स्थानिकानाही लागली आहे.
पार्ले बिस्किटाचे पुडे वाटणारे तर जवळपास प्रत्येक गावात भेटतील. काही जणांनी जलसेवा ही उत्तम मानून थंडगार बिसलेरी बाटल्या, पाऊच जे मिळेल ते दानासाठी येत असते. पानी पिऊन रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या पाहिल्या की मन हेलावते. ( सध्या स्वच्छता अभियान दिंडी प्लॅस्टिक कचरा गोळा करणे आणि त्यांची विल्हेवाट याबद्दल जनजागृती करते आहे ) तर कधी कोणी पडणाऱ्या पावसात वाटसरूची होणारी कुचंबणा पाहून खिशात हात घालून रस्त्यावर असलेले सगळे प्लॅस्टिकचे कागद विकत घेऊन वाटून टाकतो. एकादशीला राजगिर्याचे लाडू कुठे चिक्की तर कुठे खिचडी अशी मेजवानी सगळीकडेच असते.
या वाटसरूना कुठेही फक्त लाईन लागलेली दिसली की रांगेचे मागचे टोक अजून लांब घेऊन जाण्यासाठी ते लाईनीत उभे रहातात. काही लाईनीत आपल्या उपयोगाचे काही नाही हे पार लाईनीचा शेवट आल्यावर लक्षात येते. पण अजिबात न हिरमुसता नवीन लाईनच्या शोधात ही मंडळी पुढे जातात. या सगळ्या व्यवस्थेत काही अंशी दोष आपलाही असेल. आपण रहातो त्या समाजात असेही लोक आहेत आणि आपण त्यासाठी काहीही करू शकत नाही ही किती आगतिकता आहे. पण काही लोक निमित्तमात्र का होईना या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून या आनंद मेळयात आनंदयात्री म्हणून काम करतात. मुळात आनंद ही गोष्ट चिरकाल टिकणारी आहे. या सेवेतून मिळणारा आनंद त्याहून जास्त समाधान देणारा आहे. त्यामुळे येथे देणारा आणि घेणारा दोघेही एका वेगळ्याच समाधानाच्या ऊंचीवर जातात आणि गातात.
आनंदाचे डोही आनंद तरंग |
आनंदाचि अंग आनंदाचे ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)