डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
दिंडीत जमलेल्या जनसमुदाया बरोबरच पालखी सोहळ्यात काही मुक्या प्राण्यांचेही योगदान अत्यंत विलक्षण आहे. सर्व चराचर एका समान पातळीवर मानणाऱ्या या समुदायाने या मुक्या प्राण्यांनाही फार मानाची वागणूक दिली आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे म्हणताना समस्त सृष्टि समान आहे असे मानणारा हा वर्ग, प्राणीमात्रांनाही समानतेच्या नजरेने पहातो. शितोळे सरकारांकडून दिंडीला येणाऱ्या अश्वामध्ये प्रत्यक्ष माऊलीला पहाणारा हा समाज प्रत्येक चराचराचा किती विचार करतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. द्वैत भाव विसरून अद्वैताची शिकवण देणारा हा समुदाय फक्त बोलण्यापूरता ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असा न वागता प्रत्यक्षातही या वचनाला जागतो.
माऊलीच्या पालखी सोहळ्याला अंकलीच्या शितोळे सरकारांकडून अश्व पाठवले जातात. त्यापैकी एका अश्वावर माऊली आरुढ झालेली असते असा वारकऱ्यांचा ठाम विश्वास असतो. म्हणूनच जेथे शक्य होईल तेथे अश्वाच्या पायाखालची माती माथ्याला लावायला झुंबड उडते. निरनिराळ्या ठिकाणी घडणाऱ्या उभ्या, आडव्या, गोल रिंगणातून चोपदारांच्या अश्वाच्या पुढे धावणारा माऊलीचा अश्व पहाण्यासाठी वारकऱ्यांसह अनेक मंडळी डोळ्यात तेल घालून बसलेली असतात. घडणाऱ्या प्रत्येक रिंगणातली या अश्वाची धाव पहाताना प्रत्येकाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. रिंगण पूर्ण होताच अश्वाच्या पायाखालची माती जमा करायला लोकांची धावपळ असते. या गडबडीत त्यांचा उतावीळपणा इतका असतो की अनेकदा अश्व बिथरून लाथ झाडतो. हाही माऊलीने दिलेला प्रसाद आहे असे म्हणून अश्वाची लाथ मिळायलाही भाग्य लागते असे मानणारा हा भाबडा समाज आहे.
अंकली ते आळंदी असा ३०० किलोमीटरचा प्रवास करून हे अश्व जेष्ठ कृष्ण सप्तमीला आळंदीच्या वेशीवरच्या बिडकर वाड्यात दाखल झाल्यानंतर चोपदार मंदिरात अश्व आल्याची वर्दी घेऊन जातात. नंतर हैबतबाबांची दिंडी सनई चौघडयासह बिडकर वाड्याकडे येते. त्यानंतर वाजत गाजत अश्वाना मंदिरात नेऊन माऊलीच्या समाधीचे दर्शन दिले जाते. तिथून पुढे दिंडीत माऊलीच्या रथासमवेत हे मानाचे अश्व सोहळ्याची शोभा वाढवतात.
खऱ्या वारकऱ्याला दिंडीत चालताना या साऱ्या गोष्टीचे काहीच अप्रूप नसते. ज्ञानेश्वर माऊली आपल्यासोबत आहे याचेच त्यांना समाधान असते. दिंडीचा मार्ग फारच खडतर आहे. एकवीस दिवासचा प्रवास बराचसा दुष्काळग्रस्त भागातून जातो. त्यामुळे या मार्गावर पाऊसकाळ फारच कमी असतो. कधीतरी पावसाची सर येऊन जाते. पडत्या पावसातही यांच्या अभंगात भंग होत नाही. पावसाची सर येताच पडशीतले प्लॅस्टिकचे कापड डोक्यावर घेऊन अभंगाचा भंग न होता वारी चालतच असते. या पडणाऱ्या पावसाच्या धारा मग टाळ मृदुंगाच्या तालाला आपल्या परीने साथ देतात. दिंडीची बघण्याची हौस भागवायला आलेले हौशे, नवशे गौशे मात्र पावसाचे थेंब पडायला लागले की बिळात शिरून लपून बसणाऱ्या उंदरा सारखे कुठल्यातरी बिळात शिरून पावसापासून आपला बचाव करतात.
पालखीच्या मुक्कामाच्या गावात पालखीचा तळ सहसा गावातच असतो. पालखीचा तंबू विजेची रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजवलेला असतो. काही दिंड्यांचे मुक्काम गावात असतात. तर बरीचशी पाले आजूबाजूच्या गावात पडतात. मुख्य दिंडी व्यतिरिक्त येणारी मंडळी गावागावातल्या शाळेत, देवळात, कोणाच्या पडवीत, दुकानांच्या ओट्यावर, रस्त्यांच्या कडेला जागा मिळेल तिथे आडवी होतात. दुष्काळी भाग असला तरी येणारी एखादी वळवाची सर सगळ्यांचे गणित बिघडवून टाकते. पालातून राहाणाऱ्या वारकऱ्यांच्या तंबू खालची जमीन ओली होते. धोपटीतले अंगावरचे इनमीन दोन जोड पडणाऱ्या पावसाने भिजून जातात. पडणाऱ्या या पावसाला पाठीवर घेऊन वारकरी भजन कीर्तनात रात्र जागून काढतात आणि पडलेला पाऊस धरतीला नवसंजीवनी देणार या आनंदात पुढची मार्गक्रमाणा करायला हसतमुखाने सिद्ध होतात. पडलेल्या या पावसाच्या धारांनी अवघा परिसर चैतन्यमय होतो. आजूबाजूला धरती हिरव्या रंगाचा शालू अंगावर ओढते आणि निसर्ग वारकऱ्यांच्या जोडीने गाऊ लागतो.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)