डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
वारी एक अजब रसायन आहे. भक्तिरसात न्हाऊन ईश्वराचरणी लीन व्हायला चाललेला वारकरी जरी वारीचा केंद्रबिंदू मानला तरी वारीच्या परिघात अगणित लोक जमा होतात. टाळ, मृदुंग, अभंग, कीर्तनात तहान-भूक विसरून चालणारी दिंडी अत्यंत शिस्तबद्ध असते. मुंबईच्या डबेवाल्यांचा प्रिन्स चार्ल्सने उदोउदो केला तरी वारीच्या व्यवस्थापनाचे व्हावे तेवढे कौतुक फारसे होताना दिसत नाही. अत्यंत काटेकोर व्यवस्थापन कुशलतेने दिंडीची मार्गक्रमणा होत असते. माऊलीच्या रथा पुढे आणि मागे विशिष्ट क्रमाने दिंडी चालत असते. दिंडीतल्या आंधळ्या माणसालाही दिंडीत कुठे सोडून आले तरी कोणाच्याही मदतीशिवाय तो रात्रीच्या मुक्कामापर्यंत आपल्या दिंडीत न चुकता पोहोचणारच इतक्या काटेकोरपणे दिंडीचे हे कार्य चालते.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात वर्षानुवर्षे नोंदणीकृत (रजिस्टर्ड) दिंडी आहेत. रथापुढे नोंदणीकृत सत्तावीस दिंडया आणि रथामागे जवळपास साडेचारशे नोंदणीकृत दिंडया चालतात. पालखी सोहळ्यात अनेक दिंडी नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्यंत काटेकोरपणे अनेक नियमांचे व्यवस्थित पालन करणाऱ्या दिंडीना अनेक वर्षांनंतर नोंदणी मिळते. नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक दिंडया पालखी सोहळ्यात रजिस्टर्ड दिंडीच्या मागे असतात. त्यांच्यामागे इतर जनसमुदाय चालत असतो. नोंदणी नसलेल्या काही दिंडी तर सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या एक दिवस पुढे असतात. सोहळ्यात जमा होणाऱ्या जनतेची मोजदाद करणे निव्वळ अशक्य काम आहे. दरवर्षी होणाऱ्या पेरणीच्या कामावर हा जनसमुदाय कमी जास्त होत असतो. वेळेत पेरण्या झाल्या तर वारकरी समाधानाने दिंडीत सामील होतो.
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊली, देहूहून तुकाराम महाराज, सोपानदेव सासवडातून, त्र्यंबकावरून निवृत्ती महाराज, मुक्ताबाई जळगावातून या व अशा अनेक पालख्या संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरीला येत असतात. या संतांचे प्रतीक म्हणून पालखीत चांदीच्या पादुका ठेऊन अत्यंत भक्ति भावाने वारकरी पंढरपुरी पोहोचतात. आषाढ शुद्ध नवमीला सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि दशमीला पंढरीत पोहोचतात. स्वत: सैनिकी शिस्तीत वाढलेल्या हैबतबाबांनी वारीची आखणी केली असल्यामुळे आजही सोहळ्याच्या राहुट्यांची रचना, सोहोळयात बिगुलाच्या ऐवजी कर्णा वाजवण्याची पद्धत, काही ठराविक अंतर चालल्यानंतर विसावे घेण्याची पद्धत, रथाच्या पहिल्या दिंडीपुढे पालखी सोहोळयाच्या आगमनाची वर्दी देणारा नगारखाना या सगळ्या गोष्टी सैनिकी शिस्ती प्रमाणे चालतात.
मुक्काम तळावरून सकाळी पालखी निघताना वारकऱ्यांना इशारा करण्यासाठी तीनदा कर्णा वाजतो. पहिल्या कर्ण्याला वारकरी सामानाची आवराआवर करतात. दुसऱ्या कर्ण्याला पालखी सोहोळयात दिंडी सज्ज होते आणि तिसऱ्या कर्ण्याला दिंडी प्रवासाला सुरुवात करते. इथून पुढे ठराविक अंतरावर न्याहारीचा, नंतर जेवणाचा, संध्याकाळचा विसावा तसेच रात्रीचा मुक्काम असे अत्यंत काटेकोर नियोजन असते.
पहावया विठ्ठलाचे रुप
हौसेने येती की हो हौशे
संकटी पाडूनिया भगवंता
फेडती नवस ते नौशे
मिळे पोटापाण्याचा आधार
म्हनोण जमा झाले गौशे
दिंडीच्या या शिस्तीला गालबोट लावण्यासाठी अनेक लोक आपल्या परीने हातभार लावतात. दिंडी सोहोळयाची मजा पाहायला आलेले हौशे, अनेक कारणांनी देवाला साकडे घालून आपले काम देवाने करावे अशी धमकी देणारे नवशे, आणि पोटापाण्याची चिंता मागे ठेऊन काहीतरी गवसणार म्हणून आलेले गवशे या सगळ्यांच्यामुळे मिळून वारी बेशिस्त आहे असे चित्र निर्माण होत असते. पण सत्य पहाता वारी हा अत्यंत नियोजनबद्ध सोहळा आहे.
दिंडी सोहळ्यात कोणीही माणूस उपाशी रहात नाही ही दिंडीची विशेषता आहे. दिंडीच्या मार्गावर प्रत्येक गावागावात अनेक अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित की असतात. आपला पुण्यसंचय वाढावा ही त्यामागची अपेक्षा असते. खरा वारकरी कधीही या अशा अन्नदानाच्या लोभाने वारीची शिस्त मोडत नाही. आलेले हे हौशे, नवशे आणि गवशे मात्र मिळणाऱ्या या अन्नाला महाप्रसादाचे नाव देऊन आपल्या पोटाची भूक फार चोखंदळपणे भागवतात. चवदार जेवण असेल तर भरपेट खाऊन जमलेच तर नंतरच्या भोजनासाठी बांधूनही घेतात. भोजनाच्या पत्रावळ, इतर टाकून देण्याच्या गोष्टी या जेवणावळीच्या आसपास बिनदिक्कतपणे टाकून दिल्या जातात. याउलट दिंडी सोहोळयातल्या दिंडया जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची चोख व्यवस्था ठेवतात. यामुळे एकंदर संपूर्ण सोहोळयाला शिस्त नाही असे चित्र विनाकारण निर्माण होते.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)