डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
प्रस्थान सोहळा……
दिंडी चालली चालली,
विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा,
भक्त नामात रंगला……
वारीची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यातही ही परंपरा चालू होती. विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष त्यांच्यापासून त्यांच्या घराण्यात वारीची परंपरा चालू आहे ती तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली. पिढ्यानपिढ्या ही वारी चालू होती. माऊलीच्या पादुका गळ्यात बांधून नेण्याची वारीची परंपरा होती. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबतबाबा यांनी अठराव्या शतकात या वारीला ‘पालखी सोहळ्याचे’ रूप द्यायचे काम केले. सुरुवातीला औंधच्या पंतप्रतिनिधींकडून पालखी सोहळ्याला हत्ती, घोडे येत असत, त्याचा खर्च पेशवे सरकार करीत होते. इंग्रज सरकारच्या काळात हा खर्च बंद करण्यात आला. पुढे अंकलीचे शितोळे सरकार यांच्याकडून पालखीसाठी घोडे, सेवेकरी, तंबू हा सारा लवाजमा येत असे तो आजतागायत चालू आहे. त्यामुळे आजही शितोळे सरकारांना वारीत आदरणीय स्थान आहे.
जेष्ठ वद्य सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहुतून प्रस्थान होते. तर जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होते. ठरलेल्या सुमुहूर्तावर प्रवास चालू करणे याला प्रस्थान म्हणतात. आळंदीत ठराविक मानाच्या दिंडया प्रस्थानच्या दिवशी जमतात. पांढरा सदरा, धोतर, गांधी टोपी या पेहरावात अवघा परिसर श्वेत रंगाने फुलून गेला असतो. श्वेतवस्त्र परिधान करणे हे वैराग्याचे प्रतीक आहे. वारकरी ही संसारांच्या मोहमायेत न अडकता तन्मयतेने वारकरी धर्माचे पालन करीत असतो.
अष्टमीला दुपारी चार वाजता आळंदी संस्थानाद्वारे आरती होते. त्यानंतर गावाचे सरपंच दिंडी प्रमुख व इतर वारकऱ्यांना नारळाचा प्रसाद देतात. सेवेकऱ्यांना मानाचे पागोटे दिले जाते. पालखीत माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात. टाळ, मृदंग यांचे तालावर वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जाण्याच्या आनंदात बेभान झालेला असतो. या प्रस्थान सोहळ्याच्या वेळेला मंदिराचा कळसही आनंदाने सद्गतीत होऊन हलतो अशी वंदता आहे. पालखीत पादुका ठेवल्यानंतर देवळाला प्रदक्षिणा घालून सूर्यास्ताच्या वेळी माऊलींचे आजोळ असलेल्या गांधीवाड्यात विश्रामाला पोहोचते.
दुसरे दिवशी म्हणजे नवमीला पालखी सकाळी आळंदीतून पुण्याकडे प्रस्थान करते. आळंदीचे गावकरी पालखीला धाकट्या पादुकांपर्यंत सोडायला येतात. नवमीला माऊलींच्या पादुकांचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेत असतो. माऊली पुण्यात प्रवेश करताना काही वेळ आधी तुकाराम महाराजांची पालखीही पुण्यात आलेली असते. तिचा मुक्काम नाना पेठेत निवडुंगा विठोबाच्या देवळात असतो. दोन्ही मुक्काम फारच जवळ असल्याने हा परिसर भक्ति रसाने न्हाऊन निघालेला दिसतो.
एकादशीच्या पूजेनंतर दोन्ही पालाख्या एका मागोमाग एक हडपसर पर्यंत जातात आणि तिथून त्यांचे पुढचे मार्ग बदलतात. माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवड मार्गे मार्गक्रमणा करते तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी-काळभोर मार्गे पुढे निघते. इतर अनेक पालख्यांच्या सोबत दोन्ही पालख्या शेवटी वाखरीला पुन्हा एकदा एकत्र येतात. मानाच्या या दोन पालखी सोहळ्यांचा दिमाख इतर दिंडी सोहळ्यापेक्षा जास्त असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे देखणे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)