डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी |
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर |
चंद्रभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||
पंढरीच्या वारीचा हा महिमा अगाध आहे. हा मार्गच काही वेगळा आहे. या मार्गाची गोडी ज्याला लागली त्याला बाकी कोणत्याही गोष्टीचे अप्रूप रहात नाही. दरवर्षी न चुकता वारी घडावी अशी त्यांची इच्छा असते आणि विठ्ठल ती कोणत्याही प्रकारे घडवितो हा त्याचा विश्वास असतो. वीस एकवीस दिवस उन्हा-पावसातून चालायचे. पावसाने साथ दिली तरच पुरेशी विश्रांती मिळणार अन्यथा विश्रांतीचीही शक्यता नाही. खाण्यापिण्याची कोणतीही शाश्वती नाही, कधी मिळेल कधी नाही. कोणीही सांगू शकत नाही. चालून चालून शरीराचा प्रत्येक भाग घाईला आला आहे अशी स्थिती आहे. शरीरधर्मासाठी ‘होल वावर इज अवर’ आहे. पडत्या पावसात, अपुऱ्या साधनांच्यामुळे रोगराई पसरण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. या वारीत चालणारे वारकरी आजारी पडले तर काय करत असतील?
या प्रश्नाचे उत्तरही वारकऱ्याने विठ्ठलालाच द्यायला लावले आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या नोंदणीकृत दिंडीतले वारकरी आपला नित्यक्रम व्यवस्थित ठेवत असल्याने सहसा आजारी पडत नाहीत. नोंदणीकृत नसलेले इतर वारकरी यांना या सेवेची जास्त गरज लागते. गेल्या तीस-चाळीस वर्षात विठ्ठलाच्या आदेशाने काही सामाजिक संस्थांनी या वारकऱ्यांचे उत्तरदायित्व घेतले. त्यापैकी ‘वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट’ ही एक अशीच अग्रणी संस्था आहे. मानाची शेडगे दिंडी क्रमांक ३ यांच्या विनंतीवरून १९९२ साली एक जीप भरून औषधे घेऊन सुरू झालेली ही सेवा कशी वाढत गेली हे पहाणे फार रंजक आहे.
वारीमध्ये वारकऱ्यांना उपचारांची सोय व्हावी ही विनंती मान्य करून काही लोकांनी पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर एक जीपभरून औषधे सोबत घेऊन वारीला सेवा देण्याच्या उद्देशाने प्रस्थान केले. यांच्या अंदाजाप्रमाणे वीस दिवसांचा औषधांचा साठा त्यांच्याबरोबर होता. पण वारीत पोहोचताच एकाच दिवसात तो संपून गेला. त्यामुळे हिरमुसले होऊन ही मंडळी माघारी फिरली. पण या माघारीत पुढच्या यशाची बीजे रोवलेली होती.
मुंबईत परत आल्यानंतर ही मंडळी कंबर कसून कामाला लागली. संघटनेची बांधणी सुरू झाली. कार्यकर्त्यांची जुळणी सुरू झाली. वैद्यकीय पथकाची जुळणी सुरू झाली. येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे याचे आडाखे बांधले गेले. कागदावर उतरवलेल्या सगळ्याच गोष्टी साध्य होतातच असे नाही. ही गोष्ट या मंडळींना ही माहीत होती. अन्न व प्रशासन विभागातले काही दमदार अधिकारी या संकल्पनेने झपाटले आणि त्याच्या भरघोस पाठिंब्यावर आणि कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीने पुढील वर्षी एक जीप ऐवजी एक ट्रक भरून औषधे वारी साठी रवाना झाली. काही संस्थानी आपल्या रुग्णवाहिका या कामासाठी दिल्या. काही संस्थानी आर्थिक मदत केली. पुढे काही वर्षांनी संस्थेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर संस्थेची स्वत:ची रुग्णवाहिका आली.
हा गोवर्धन संस्थारूपी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर सावरला होता तरी बाकीच्या देणगीदारांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि डॉक्टरांच्या हातभाराशिवाय तो पेलवणे अवघड होते. सरत्या प्रत्येक दिवशी ही मंडळी वैद्यकीय पथक आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्याचा खटाटोप करत होती. चांगल्या कामासाठी चांगले लोक लगेचच तयार होतात. हाच अनुभव या संस्थेलाही आला. साथीला आलेल्या लोकांना घेऊन वैद्यकीय पथक पुढील वारीला रवाना झाले. वीस दिवसांच्या वारीसाठी आवश्यक तेवढा फौजफाटा नक्कीच हाती नव्हता. पण योजलेले काम पूर्ण करायचेच या दृढ निश्चयाने मंडळी कामाला भिडली. वारकऱ्यांच्या घडणाऱ्या सेवेने मंडळी खूष होती. साक्षात माऊलीचे काम आपल्याकडून घडते आहे या आनंदात दोन दिवस सेवेसाठी आलेली मंडळी आपल्या कामाला बाजूला सारून चार-चार दिवस थांबली. पहिली नड भागली. अनुभवात भर पडली. पण संकटाची मालिका संपणारी नव्हती.
सुखवस्तू घरातून आलेल्या डॉक्टरांना आणि कार्यकर्त्यांना सोयी निर्माण करून देणे आवश्यक होते. सगळ खरं पण वारकऱ्यांसारखी पालात रहायची सवय कोणाला होती? हॉटेल, लॉजमध्ये वास्तव्य संस्थेच्या आर्थिक गणितात बसण्यासारखे नव्हते. जिथे आपल्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी मंडळी शेडगे दिंडी क्रमांक ३ मधून येणाऱ्या डब्याची वाट पहात असायची तिथे हॉटेलचे रहाणे कसे परवडणार? यावर उपाय म्हणून सुरुवातीला अनेक वर्ष येणाऱ्या वैद्यकीय पथकासह अनेक कार्यकर्त्यांनी कित्येक रात्री उघड्या माळावर झोपून काढल्या आहेत. घरून आणलेल्या अंथरूणांत थंडी मावत नसताना, एकमेकांच्या जिव्हाळ्याची ऊब घेत रात्री मजेत घालवल्या आहेत. रहाण्याची सोय नाही म्हणून महिला डॉक्टरांना सुरुवातीला बोलावणे नव्हते. संस्थेची आर्थिक घडी बसल्यावर हळूहळू त्यांनाही सेवेत स्थान मिळाले. आजच्या घडीला महिला डॉक्टर पुरुष डॉक्टरांच्या खाद्याला खांदा लावून हिरीरीने काम करत आहेत.
संस्थेचे उत्कृष्ट चाललेले काम पाहून अनेक दानशूर मंडळीनी मदतीचा हात सढळपणे पुढे केला. कोणाची म्हणून नावे सांगायची. समाजाच्या सगळ्याच स्तरातून जमेल ती मदत संस्थेकडे आली. कोणी वारीला लागणारे ट्रक, कोणी त्याचे डिझेल, कोणी औषधे, कोणी पैसे, कोणी शिधा, लागणारी भांडी अशी जमेल तशी मदत करू लागला.
संस्थेतर्फे सरत्या वर्षागणिक लोकांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या. कार्यकर्ते, वैद्यकीय पथक सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू लागले. कालांतराने कार्यकर्ते आणि वैद्यकीय पथकासाठी कॅम्पच्या ठिकाणांच्या जवळपास हॉटेलात रहाण्याची सुविधा निर्माण झाली. जेवणासाठी अजूनही शेडगे दिंडीवर अवलंबून असल्याने, शेडगे दिंडीच्या जवळपास दुपारचा विसावा असेल तिथे कॅम्प लागू लागला. जेवण तयार असल्याची खबर मिळाली की दोन-चार मंडळी आळीपाळीने जाऊन जेवण जेवून येऊ लागली. हा थोडा द्राविडी प्राणायाम होता पण ती काळाची गरज होती. संस्थेकडे काही शिल्लक जमा झाल्यानंतर स्वत: जेवणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ या उद्देशाने जेवणाची एक गाडी पुढील वर्षांपासून सेवेत रुजू झाली. आजतागायत या जेवणाची जबाबदारी कोणी ना कोणी आपल्या मनाने घेते. यासाठी कोणाला दबाव टाकावा लागत नाही.
सहकाराचे बाळकडू रक्तात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील मंडळीनी एकमेकांच्या हाकेला धावत जाऊन कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण केली. मुंबईतले आणि आजूबाजूच्या इतरही जिल्ह्यातले अनेक प्रथितयश डॉक्टर संस्थेतर्फे वैद्यकीय सेवा देण्यासाठी हजर राहू लागले. ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गावर सेवा देणारी ही संस्था वाढीला लागताच तुकाराम महाराजांच्या दिंडीबरोबरही सेवेला सुरुवात केली. पुण्याच्या कार्यकर्त्यांनी तुकाराम महाराजांच्या दिंडीच्या कॅम्पची सगळी व्यवस्था आपल्या शिरावर घेतली.
आजच्या घडीला दोन्ही दिंडी सोहळ्यात ट्रस्टतर्फे साधारणपणे दोन ट्रक भरून औषधांचे वाटप होते. साधारणपणे अडीचशे ते तीनशे डॉक्टर्स आणि त्याच्यापेक्षा अधिक कार्यकर्ते या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. पालखीच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणाच्या तीन-चार किलोमीटर अलीकडे रोजच्या रोज कॅम्प उभारला जातो. त्यासाठी आदल्या रात्री जेवणानंतर औषधांचा ट्रक आणि काही मंडळी जागा पटकवायला जातात. सकाळी आठच्या सुमारास हॉटेलवरून डॉक्टरांची टीम कॅम्पला पोहोचते, त्याच्यानंतर शेवटचा वारकरी मुक्कामाला जाईपर्यंत ही सेवा अखंडित चालू रहाते. सूर्यास्ताच्या सुमारास शेवटची दिंडी या ठिकाणाहून पुढे जाते. या कॅम्पशिवाय दोन्ही दिंडीत रुग्णवाहिकेवर दोन डॉक्टर पाठवून मोबाईल सेवाही दिली जाते. रस्त्यात काही अत्यावश्यक सेवा देण्याची गरज लागली तर या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो.
टाळ, मृदंगाच्या तालावर माऊलीच्या या भक्तांना औषधोपचार करताना प्रत्येकाला एक वेगळेच समाधान लाभते. इथे पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असा कोणाचाही अट्टाहास नसतो. उलटपक्षी औषधोपचारासाठी येणारा माऊली हा प्रत्यक्ष विठ्ठल आहे त्याच्या चरणाचे दर्शन म्हणजे विठुरायाच्या चरणाचे दर्शन हा विश्वास प्रत्येकाला आहे. इथे काम करणारा प्रत्येक जण आपला हुद्दा, सामाजिक स्थान विसरून काम करतो. मुंबईत स्वतःचे हॉस्पिटल चालवणारे अनेक डॉक्टर नवशिक्या डॉक्टरांना सांभाळून माऊलीची सेवा करतात हे दृश्य अत्यंत भावस्पर्शी असते. थोडक्यात ‘भेदाभेद अमंगळ’ या शब्दांची खरी प्रचिती येथे येते.
ट्रस्टच्या याच कामाची दखल पालखी सोहळ्याने तसेच विठ्ठल देवस्थानाने जाणीवपूर्वक घेतली आहे. म्हणूनच आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या चारही एकादशीला विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी आमंत्रित केले आहे. वैद्यकीय सेवेसाठी पालखी सोहळ्याचे प्रथम प्राधान्य ‘वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट’ कडेच असते हा इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचा बहुमान आहे. एकादशीची ही सेवा गेले बारा वर्षे अखंडित पणे नामदेव पायरीच्या वर दर्शन मंडप व मुख्य मंदिराला जोडणाऱ्या जोड पुलावर चालते. तसेच नामदेव पायरी जवळ ही सेवा चालते. सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने गेले अठ्ठावीस वर्षे ट्रस्टचे वारीच्या सेवेचे हे काम चालू आहे.
ट्रस्टचे वारीतलेच काम इतके अफाट आहे की ते सांगायला दिवस पुरणार नाही. वारीसोबत ट्रस्ट इतरही अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा देत असते यांचा फक्त इथे उल्लेख करतो. महाराष्ट्रातील देवाच्या सगळ्याच मोठ्या यात्रा, कुंभमेळा, नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी ट्रस्ट मार्फत कॅम्प आयोजित केले जातात. मुंबई लगत वाडा, डहाणू, पालघर इत्यादी ठिकाणच्या आश्रम शाळेत ट्रस्ट मार्फत नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी कॅम्प आयोजित केले जातात. नेरळ माथेरान रस्त्यावर एका आश्रम शाळेत नियमित साप्ताहिक दवाखाना चालवला जातो. तसेच महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, लालबागचा राजा इथेही मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात व नियमित रुग्ण तपासणी केली जाते.
मी डॉ नरेंद्र भिकाजी कदम ट्रस्टसोबत गेले चोवीस वर्षे सपत्नीक सेवा देत आहे, तसेच या लेखांचे सुलेखनकार डॉ तेजस लोखंडे गेले बारा वर्षे ट्रस्टच्या सेवेला हजर असतात. माऊलीच्या भक्तांची सेवा करण्याचे पुण्य ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते आहे हे आमचे परमभाग्य आहे.
कोरोना काळात दोन वाऱ्या हुकल्याचे दु:ख प्रत्येकालाच आहे. पण माऊलीच्या कृपाशीर्वादाने हाती घेतलेली ही संकलित लेखनमाला तुम्हापर्यंत पोहोचवताना दिंडीत वैद्यकीय सेवा देताना अनुभवलेला प्रत्येक क्षण पुन्हा अनुभवता येतो आहे याचे समाधान आहे.
संस्थेचे आजचे रूप पहाता कदाचित माऊली ही हेच म्हणत असतील.
इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगनावरी ।।
मनाची या गुंफी गुंफियेला शेला |
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)