डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असतो त्या गावाला जत्रेचे स्वरूप येत असले तरी गावाच्या इतर जत्रा आणि वारी यामध्ये फार मोठे अंतर आहे. मुळात वारीचा कार्यक्रम आखताना तिथी वृद्धी-क्षय याचा विचार केला जातो. तसेच मुक्कामाचे गावाचे महत्वही विचारात घेतले जाते. लोणंद सारख्या व्यापारी पेठेच्या गावात प्रवासाच्या साधनाच्या विपुलतेमुळे पालखीच्या दर्शनार्थ जास्त माणसे अपेक्षित असतात त्यामुळे या ठिकाणी पालखीचा मुक्काम जास्त काळ असतो. अर्थात हा एक ढोबळ नियम आहे.
वारीचा अनुभव हा फार अलौकिक आहे. वर्षानुवर्ष येणाऱ्या या भक्तांची वाट पहाट प्रत्यक्ष देव कटीवर हात ठेऊन न विटता विटेवर उभा आहे. भक्ताला भगवंताच्या भेटीची जितकी आस आहे त्याच्यापेक्षाही कैक पटीने जास्त आस, भगवंताला भक्तांच्या भेटीची लागली आहे. म्हणूनच प्रत्येक वारकरी खिशात पैसा असो नसो, वारीचे शारीरिक कष्ट सहन करण्याची शारीरिक स्थिती असो वा नसो वारकरी हा वारीला जाणारच. त्याचा अढळ विश्वास असतो की कोणत्याही परिस्थितीत विठू माऊली मला पंढरीला घेऊन जाणार.
वारी ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे म्हणून कोणीही न बोलावता न चुकता वारकरी नेमाने वारी करतो. पण हल्ली गमंत म्हणून वारी करण्याचे वेड आले आहे. कोणी वारी अनुभवायची म्हणून येतो, तर कोणी सहजासहजी चालण्याने वजन कमी होईल असा परमार्थाच्या जोडीने स्वार्थ बघतो, कोणी चेंज ऑफ क्लायमेट म्हणून वारीत मिसळतात. वारीतल्या माणसात ते एकरूपही होतात पण मुळात वारी म्हणजे काय हे न कळलेल्या या माणसांना वारीचा आनंद मिळेल का? याचे उत्तर नकारात्मक असले तरी काही अंशी का होईना पण या वारीची गोडी अनेकांच्या मनात निर्माण होते.
दिंडी सोहळा म्हणजे अठरापगड जातीजमातीचा अख्खा गाव. मजल दरमजल करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी एका गावातून पुढे दुसऱ्या गावात चालला आहे. या गावात काय नाही ? गावात मिळणारी प्रत्येक गोष्ट या दिंडी सोहळ्यात मिळतेच. सुरुवातीला दिंडी मार्ग दुहेरी असताना होत असलेली वाहतूक कोंडी दिंडी मार्ग चौपदरी झाला तरी तशीच आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूने दिंडीचे ट्रक व इतर वहाने जात असतात. तर डाव्या बाजूने सकाळच्या पहिल्या प्रहरापासून चालणारे वारकरी दिवसभर चालत असतात. त्यांच्या डाव्या बाजूला जीवनावश्यक वस्तु घेऊन बसलेली मंडळी या लोकांची गरज भागवित असतात.
दिंडीची चहाची तल्लफ म्हणजे मोडनिंबचा (मोडनिंब हे गावाचे नाव आहे) सागर अमृततुल्य. अख्ख्या दिंडी सोहळ्यात पाचपन्नास मोडनिंब चहाच्या टपऱ्या असतील. त्याच्या जोडीला पान, बिडी, सिगरेटची दुकाने. मध्येच लोकांची भूक भागावायला एखादे हॉटेल, त्याच्या आसपास पावसापासून बचाव करणारे प्लॅस्टिकचे कागद विकणारी मंडळी, रात्री वारकऱ्याला रस्ता दाखवायला बॅटरी विकणारी मंडळी. संत साहित्याचे पुस्तक भंडार. त्यांच्या आसपास लोकांच्या हजामती करायला बसलेले नाभिक, तुटक्या चपलांना सांधून देणारे चर्मकार बंधु इतकेच काय कडक इस्त्रीचे कपडे घालून मिरवायचे असले तरी इस्त्रीवालाही इथे हजर आहे. हजारो करोड रुपयांची इथे देवाणघेवाण होत असते.
अगदी सुरुवातीच्या काळात घरच्यांशी संपर्काचे एकमेव साधन म्हणजे पोस्टाची सेवा होती. तेव्हाही तशी त्याची फारशी गरज भासत नव्हती. तरीही केवळ माणसाचे नाव आणि दिंडी क्रमांक टाकला की पुढच्या मुक्कामापूर्वी पत्र अचूकपणे मालकाच्या हाती मिळत होते. इतके काटेकोर नियोजन दिंडीचे होते आणि आजही आहे. पत्राचे दिवस सरू लागले लँडलाईन टेलिफोनचे दिवस सुरू झाले. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी कॉईन बॉक्सचे पेव फुटले. मुक्कामाच्या ठिकाणी कॉईन बॉक्सवरून फोन करण्यासाठी भली मोठी लाईन लागू लागली. काही दिवसांनंतर छोट्या टेम्पोवर कॉईन बॉक्स बसवून मोबाईल फोन सेवा चालू झाली. मोबाईलचा जमाना आल्यानंतर व्हेंटीलेटरवर असलेल्या पोस्टाच्या पत्र सेवेने पारच राम म्हटले आणि मोबाईल टेम्पोवरचे कॉईन बॉक्स जाऊन त्याजागी पाच-दहा रुपये घेऊन फोनला चार्ज करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या. लोकांचा प्रपंचिक संपर्क दिवसेंदिवस वाढत चालला, पण पारमार्थिक संपर्काचा धागा विरळ होत चालला का ? हा प्रश्न सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे.
काहीही असले कसेही असले तरी आषाढाची चाहूल लागताच, आजही पांडुरंगाच्या दर्शनाची आस सगळ्यांनाच लागते. एक-एक माणूस माळेसारखा जोडला जातो. जसा ओहोळ ओढ्याला, ओढा नदीला आणि नदी सागराला भेटताना विशाल विशालतम आकार घेत जाते. तसा हा जनांचा सागर, पंढरीत पोहोचेपर्यंत महासागर होतो. इथे कोणालाही आमंत्रणांची गरजच नाही. खांद्यावर भगवी पताका, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, तुळशीमाळ गळा, हातात टाळ आणि मुखाने ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकरी आपसूक पंढरीकडे वहात जातो. इथे जमा झालेली सगळीच माणसे आपले लहान-थोर, उच्च-नीच, राव-रंक पण विसरून आभाळाएवढी मोठी बनतात. मनातले सारे किंतु परंतु बाजूला सारून विठ्ठलाच्या नामात न्हाऊन निघालेले हे वैष्णव विश्वबंधुत्वाचा अनोखा संदेश जगाला देताना म्हणतात.
वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे॥
होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे॥
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)
हेही वाचा: वारी रथांच्या बैलजोड्यांमागेही आहे परंपरा…