मुक्तपीठ टीम
आता मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने जोगेश्वरीकडून जाताना तुम्ही मान वळवून पाहणार नाही असं होणारचं नाही. कारण तिथे साकारण्यात आलं आहे भव्य असं भित्ती चित्र. जोगेश्वरीमधील आय.वाय कॉलेजचा परिसर हा विस्तीर्ण आहे. या कॉलेजचा कॅम्पस मुंबईतील सर्वात मोठा कॅम्पस आहे आणि या कॉलेजची भिंतही सर्वाच उंच मोठी भिंत आहे. अनेक दशकं ही भलीमोठी भिंत ओकीबाकी वाटत असे. आता मात्र, स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या भिंतीचा कायापालट झाला आहे. ती सुंदर अशा चित्रांनी सजवण्यात आली आहे. त्यामुळे वेस्टर्न ए्क्स्प्रेस हायवेनं जाणाऱ्यांचं ती लक्ष वेधून घेतेच घेते.
आय.वाय कॉलेजची या भिंतीच्या सुरुवातीला आय लव्ह जोगेश्वरी असं सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. पुढे भिंतीवर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा मांडणारी सुंदर अशी चित्र काढण्यात आली आहेत. ही भिंत आकर्षणाचे केंद्र बनवण्याच्या भावनेने सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या भिंतीवर घडवण्यात आले आहे. महाराष्ट्रात महत्वाची भूमिका बजावणारे काही लोकप्रिय मराठी माणसांची चित्र भिंतीवर साकारली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला महाराष्ट्र या भिंतीवर रेखाटण्यात आला आहे. या भिंतीवर छत्रपची शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, महान समाजसुधारक महात्मा फुले, लोकमान्य टिळक, दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि महाअभिनेता अमिताभ बच्चन यांची चित्रं या भिंतीवर काढण्यात आली आहेत.
तसेच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल, मुंबईचा डबेवाला, मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक आणि मासे विकणारी बाई हेही या भिंतीवर अवतरले आहेत.
भित्तीचित्रांचे संकल्पक शिवसेना आमदार रवींद्र वायकर काय म्हणतात?
जोगेश्वरीची ही भिंत भलीमोठी होती. या महामार्गाला आधी अहमदाबाद हायवे असं म्हटलं जायाचं आम्हाला. महानगपालिकेच्या शाळेत असताना धावायला तिथे घेऊन जायचे. तेव्हा तिथे रहदारी नव्हती. त्यावेळेला ही भिंत बांधण्यात आली. खरंतर नगरसेवक असल्यापासून जोगेश्वरीच्या सौंदर्यीकरणाचं मनावर घेतलं आहे. त्यातून अनेक संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. या भिंतीला पाहिल्यावर वाटलं की या भिंतीवर चित्र काढली तर नाविन्यपूर्ण वाटेल.
मी काही कलाकारांना बोलावलं आणि आपण या भिंतीवर काय करू शकतो, चांगल्या गोष्टी कशा दाखवू शकतो, कोणत्या थोर व्यक्तींची चित्र काढू शकतो का? यावर साधकबाधक अशी चर्चा झाली. आणि त्यानंतर हे जे विशाल आणि भव्य भित्तीचित्र त्यावर दिसत आहेत ते साकारण्यात आले. एक प्रेक्षणीय जागा असं वर्णन या जागेचं करता येईल.ही भिंत चित्रांनी सजवण्यात आल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय भिंत असे म्हणत प्रशंसा केली, तेव्हा केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं.
पाहा व्हिडीओ: