मुक्तपीठ टीम
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जमीन जशी पिकांसाठी सुपीक तशीच सहकारासाठीही. एकमेका सहाय्य करून अवघ्यांनी सुपंथ धरणं इथल्या माती आणि माणसांचं वैशिष्ट्यच. सहकारातून समृद्धीचा मंत्र सर्वाधिक प्रभावी ठरलाय तो इथंच. सातारा जिल्ह्यातील आरडगाव या गावानं सध्या “गाव करेल ते राव काय करेल” हे दाखवून देण्याचा जणू चंगच बांधलाय. गावकऱ्यांनी एकत्र येत आपल्या गावाच्या स्मशानभूमीला बदलण्याचं काम हाती घेतलंय.
कुणाचीही मदत नाही. लक्ष नाही. त्यातून ओसाड जमिनीवर अंत्यविधी केले जात म्हणून ती स्मशान भूमी होती. आरडगावचे गावकरी एकत्र आले. त्यांनी स्मशानभूमीची भयान ओसाड अवस्था बदलण्याचा निर्धार केला. ठरवलं तिथं हिरवाई फुलवायची. मग गावातील तिथंच राहणाऱ्या सर्वांनी वर्गणी काढली. कोरोना संकटामुळे ती ऑनलाइन आपापल्या परीनं गोळा झाली. त्यातून मग काहींनी बुलडोझर, जेसीबी साधनं पुरवली. ओबडधोबड, ओसाड जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं. इथं पहिला टप्पा सर झाला.
त्यानंतर गावकऱ्यांनी श्रमदानानं खड्डे खोदले. पाहता पाहता ३५० खड्डे झाले. मग मिळतील तेथून काहीशी वाढलेली रोपं आणली गेली. पण ती जागा पूर्ण मुरमाड असल्याने खड्ड्यांमध्ये काळी माती भरली गेली. त्यानंतर त्यात जमवलेली ४ ते ५ फूट उंचीची झाडे लावण्याचे काम सुरु करण्यात आले.
यापूर्वीही याच परिसरात दोनशे झाडे लावली असून त्यांचे योग्यरित्या संवर्धन केले जात आहे. या झाडांपासून गावाला भरपूर ऑक्सिजन मिळेल, पाऊस भरपूर पडेल, लोकांना सावली मिळेल यासाठी वृक्षारोपण हा अवघ्या गावाचा उद्देश आहे. गावाशेजारचा डोंगर हिरवाईनं नटतोय, तोही अशा तरुणांच्या प्रयत्नांमधूनच. अवघ्या गावाच्या प्रयत्नांमुळे भविष्यात हिरवंगार आरडगाव अशीच ओळख निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको.