विकास लवांडे
1) सुरुवातीच्या ( 2020 ) टप्प्यात सर्वजण घाबरून असायचे. रुग्णाला वाळीत टाकण्यापर्यंत प्रयत्न झाले. हॉस्पिटलमध्ये डॉ व त्यांचा स्टाफ सुरक्षित राहून कार्यरत होते. डॉक्टरांना आत्मविश्वास नसायचा , दुसरीकडे रुग्णाला शारीरिक व मानसिक सुद्धा त्रास होत असायचा कारण स्वतःचे मरण समोर दिसत असतांना जवळचे लोक सुद्धा जवळ नसायचे. जगण्याची खात्री नसायची.
2) 2021 मधील दुसरा टप्पा मात्र वेगळा आहे उपचारा बाबत डॉक्टरांना आत्मविश्वास आलेला आहे हॉस्पिटलमध्ये सर्वजण रुग्णांना आवश्यक ती सेवा देताना आता घाबरत नाहीत. रुग्णाला जवळचे लोक दुर्लक्षित करत नाहीत. रुग्णांना रेमडिसिव्हर सारखे इंजेक्शन मोठा आधार आहे वरदान म्हणावे लागेल. रुग्णाला आता योग्य उपचाराची व जगण्याची आशा वाटते. रुग्ण सुद्धा बिनधास्त असतात.
याकाळात औषध इंजेक्शन चा मारा असतो , त्यामुळे सर्वांची शुगर लेव्हल वाढते , थकवा जाणवतो , तोंडाची चव जाते , पूर्ण आराम करावा वाटतो. कुणीही विनाकारण फोन करून त्रास देऊ नये असे वाटते. रुग्ण हळूहळू बरा होत असल्याची लक्षण म्हणजे भरपूर भूक लागणे , खोकला बंद होणे, ताप थंडी बंद होणे , दम न लागणे. ऑक्सिजन लेव्हल 95/ 96 पेक्षा जास्त असणे. इत्यादी. योग्य उपचारानंतर पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट यायला किमान 17/18 दिवस लागू शकतात.
मला येथील डॉ रामकर , डॉ राडे व त्यांचा सर्व सहकारी स्टाफ चांगली सेवा देतोय त्यांचा मी ऋणी आहे. शिवाय आपले सर्वांचे प्रेम व आशीर्वाद जोडीला आहेत.म्हणून माझी तब्येत सुधारत आहे. औषध उपचार सुरू आहेत.मी लवकरच काही दिवसात आपल्या सेवेत असेल. सध्या अनेकांना हॉस्पिटलमध्ये वेगवेगळी मदत व सहकार्याची गरज आहे पण माझा नाईलाज आहे. सरकारी डॉ व आरोग्य अधिकारी मदत करतील त्यांचे सहकार्य मिळवावे इतका सल्ला देऊ शकतो.
( मेडिक्लेम नसेल तर आर्थिक टेन्शन नक्की राहणार पण मेडिक्लेम असेल तर आपल्याला टेन्शन फ्री उपचार घेता येतात )
स्वतःची काळजी स्वतः घेणे शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करणे हाच आपल्या हातातील उपाय आहे.
(विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते आहेत.)