मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना १४१ कोटी ६४ लाख २१ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
वडेट्टीवार म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांनी ३१ मार्च २०२१ पूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबीविचारात घेऊन राज्य कार्यकारी समितीने २७ एप्रिल २०२१ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना रु. १४१,६४,२१,०००/- (रुपये एकशे एकेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकवीस हजार) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी ७३१९.९७ लाख रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी ५५७३.८५ लाख रूपये, विभागीय आयुक्त नाशिक साठी २४५.२० लाख रूपये आणि विभागीय आयुक्त औरंगाबाद साठी १०२५.१९ लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत.