मुक्तपीठ टीम
विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली होती. या आगीत १५ निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या रुग्णालयाचे अग्निसुरक्षा ऑडिटही करण्यात आले नव्हते. धक्कादायक म्हणजे अग्निशमन दलाचा ना हरकत परवाना नसतानाही रुग्णालय सुरु होते. एवढेच नव्हे तर स्थानिक मनपाने कोरोना रुग्णालय म्हणून मान्यताही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तसेच दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अन्य लोकांवरही कारवाई केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा (५६) आणि शैलेश पाठक (४७) यांना अटक केल्यानंतर वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले गेले. त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांना पोलिसांनी हलगर्जीपणा आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप लावत अटक केली आहे.
तपासात काय समोर आले?
• सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे रुग्णालय प्रशासनाने पालन केले नव्हते.
• विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या वर्षभरात एकदाही अग्निसुरक्षा ऑडिट झालेले नाही.
• या रुग्णालयाकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ही नव्हती.
• एक प्रकारे बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या या रुग्णालयाला तरीही कोरोना रुग्णालय म्हणून वसई-विरार मनपाने परवानगी दिली होती.
• रुग्णालय प्रशासन दोषी आढळल्याने दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
• पुढील तपास सुरु आहे.