विजय मांडके
महात्मा गांधी म्हणाले होते की त्यांना १२५ वर्षे जगायचे आहे , भरपूर कामे करायची आहेत. पण त्यांना मारण्यात आले. मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे त्यामुळे मी ८३ व्या वर्षातून ८४ व्या वर्षात पदार्पण केले म्हणजे मला अजून ४२ वर्षे जगायचे आहे. आणि त्यादृष्टीने उरलेल्या वर्षांचे नियोजन करीत आहे. आणि हे नियोजन तू ( विजय मांडके) आणि मिनाज (होय मिनाज सय्यद) बरोबर असलात की नक्की पूर्णत्वास देऊ याची मला खात्री आहे.
हे संभाषण माझे आणि ज्येष्ठ विचारवंत , वैज्ञानिक , लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यातील आज सकाळचे आहे. त्यांना मी आज वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी फोन केला. त्यावेळी ते माझ्याशी बोलत होते. डॉ दत्तप्रसाद दाभोळकर हे अफलातून व्यक्तिमत्व आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर व त्यांच्या विचारावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. स्वामी विवेकानंदांचे जातीअंताचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये
- छाया (कवितासंग्रह)
- ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
- तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
- दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
- ना डावं ना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
- प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
- बखर राजधानीची (समग्र)
- माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
- राजधानी इंद्रप्रस्थ
- विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
- शोध स्वामी विवेकानंदांचा
- समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक) यांचा उल्लेख करावा लागेल.
- विशेष म्हणजे भानू काळे यांनी ” रंग याचा वेगळा ” दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन हे व्यक्तिचित्रण प्रकाशित केले आहे.
आता त्यांचा सुमारे साडेतीनशे पानांचा स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा आगळा वेगळा ग्रंथ प्रकाशित होत आहे. प्रकाशकाकडे तो पाठवण्यातही आला आहे. अतिशय उत्साही, अभ्यासु, हरहुन्नरी असा हा माणूस आहे. अनेक पैलूंवर व अनेक विषयावर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे
मुळात सर्वच दाभोळकर बंधू हे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य कायम ठेवून समाजात वावरत आलेले आहेत.
डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या सातारा येथील निवासस्थानाचे नावच ” या ” असे आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्याचे स्वागतही अतिशय दिलखुलासपणे होत असत अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्यापासून ते पत्रकार निखिल वागळे, भानू काळे यांच्यापर्यंत त्यांचे स्वागत केले जाते. साताऱ्यातील अरुण गोडबोले, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, विश्वास दांडेकर, किशोरशेठ नावंधर, बाळासाहेब जाजू ही त्यांची खास माणसे म्हणून ओळखली जातात.
सातारा येथे पैगंबर जयंती निमित्त होणारा सर्वधर्म भाईचारा सभेचा कार्यक्रम असू देत किंवा परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचा कोणताही कार्यक्रम असू देत त्यात आपला वाटा उचलणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा. त्यांच्या हातून जातिअंताच्यासाठी प्रबोधनाचे काम सातत्याने होत राहो. याच सदिच्छा.
(विजय मांडके हे मराठीतील प्रिंट, टीव्ही माध्यमात गेली तीन दशके सक्रिय असणारे व्यासंगी पत्रकार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते अनेक उपक्रमांना सहकार्य करतात.)