विजय बाळासाहेब गिते-पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेल्या कैक गुणांपैकी एक गुण म्हणजे संघटन-कौशल्य. महाराज समाजातील कुठल्याही व्यक्ती, अथवा समुहाशी आपुलकीने संवाद करीत, त्यांची दुःखं समजून घेत, निराकरण करीत. त्यांच्या विविध अडचणी लगेच सोडवत, आदिलशाही, मुघलशाहीने सत्तालालसेसाठी रयतेची जी वाताहत केली. ते पाहून अखंड रयतेला घाण्याला जुपलेल्या गुलामासारख रुप आलं होतं. त्याच रयतेला महाराजांनी माणसांप्रमाणे वागवलं, जीविताचे हक्क व स्वातंत्र्य दिलं, सोबतच रंजले गांजलेल्या जनांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिलं. दुबळ्याना अभय दिलं, माता भगिनींना सरंक्षण दिलं, जगण्याची लढण्याची ऊर्जा दिली.
सर्वात मुख्य म्हणजे तेव्हाची जवळपास बरीच रयत ही शेती करत, शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त त्रास होई तो लुटारू वतनदार, सामंत जहागीरदारांचा, त्याला अटकाव घातला, पर्यायाने कराचे प्रमाणे आटोक्यात आले. त्याने शेतकरी सधन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. शिवकाळी शेतकरीराजा शेतीच्या काळात मुबलक धान्य पिकवत, आणि नंतरच्या काळात तलवार दांडपट्टा हाती घेत लढाईला जात, आणि किल्ल्यावरील मुघलांचा खजिना, जो पूर्वी रयतेचा लुटलेला तो परत आणीत. महाराजांनी रयतेचे जे कल्याण केलं त्याने अल्पावधीतच महाराज रयतेच्या मनाच्या मंदिरात आत्माराम म्हणून सदैव वसले. महाराज आहे म्हणून, ज्वारीच कणीस सोन्यासारख बहरतं, धनधान्याने घराच्या कणग्या भरून टाकीच्या पाण्याप्रमाणे सांडत. अशी समृद्धी संपन्नता याच्या आधी कुणी पहिली नसेल.
महाराज आहेत म्हणून सरपणाची मोळी आणायला गेलेल्या स्त्रिया, मुली, या सायंकाळी अंधार पडल्यावर न भीत मोकळेपणाने घरी येत, घरच्यांना काळजी जरी असली तरी महाराजांच्या राज्यात आपली माय, बहीण, बायको सुरक्षित आहेत. हा विश्वास रयतेला महाराजांच्या सुसंस्कृत राज्यकारभाराने दिला. याच कारणाने राजांचे नेतृत्व लोक-मान्य, लोक-प्रिय झाले, महाराजांनी रयतेच्या जीवनातील गुलामीचा काळोख दूर होऊन, सुखाच्या आनंदाच्या रवीकिरणाने लख्ख प्रकाश पाडीत सुखी-समृध्द केलं.
महाराजांच्या संघटना कौशल्याच खरं रहस्य आणि खोलवर रुजलेली पाळंमुळं इथेच आहे अस मला वाटत. राजांनी रयेतेसाठी कार्य केले म्हणून अनेक मावळे मरण्या-मारण्याला मागेपुढे बघत नव्हते. हे एक कारण जरी असलं तरी, जनेतच्या मनात क्रांतीज्वाळेला प्रखर आणि तप्त केलं. रयतेच्या मनात आपल्या मातीचा स्वाभिमान बिंबवला. स्वराज्यस्वातंत्र्य या थोर उदारमतवादी संकल्पनेचा पुरस्कार केला.
विषय नुसतं लढावं आणि मारावे-मरावे, खजिना लुटावा, किल्ले जिंकावे, विस्तार करावा अशा विस्तारवादी मानसिकतेचा जरी असला तरी त्यामागे जी भावना होती ती आपल्या मातीशी इमान राखणारी होती, त्यानेच तर लढण्यासाठी मावळ्यांच्या मनात अमर्यादित ऊर्जासाठा निर्माण होई. शक्तीशाली संघटना निर्माण करणे म्हणजे खायच काम नाही, त्यासाठी वाणी ओजस्वी आणि प्रभावी असावी लागते, तरच तुमचं म्हणणं तुमच्या समोर असलेल्या लोकांना पटकन समजते व चटकन उमजते. आणि मुख्य म्हणजे तेही संघटनेत फूट पडू न देणे हे आव्हान पेलवणं मोठं दिव्यकार्यच होय. महाराज मावळ्यांना संबोधित. आदिवासींच्या तरुण रांगड्या लेकरांना सांगित, गलोर घेऊन जसा नेम ह्या आंब्यावर लावतो. तसाच नेम ह्या जुलमी आदिलशाह मुघलशाहच्या सैन्याच्या डोळ्यावर धर आणि फोड तो डोळा, जो स्वराज्यावर वाकडी नजर ठेवतोय, अशाने त्या गुणांना स्फूर्तीददायी प्रोत्साहन मिळत.
सामान्य रयत ही कष्टकरी, त्यांच बळ त्यांच्या कष्टापुरत सीमित न राहता. स्वराज्यासाठी खर्ची व्हावं आणि रयतेनी बिनबोभाट आनंदाने मान्य करावं ही गोष्ट काही सामान्य नव्हती, लोक मरायला तयार होत. मावळ्यांना ठाऊक होतं, ही जुलुमी सुलतानशाहीचा अंत झाल्यावरच आपल्या येणाऱ्या पिढ्या किंवा आपली लेकर मोकळेपणाने मनसोक्त जगतील. अशा उदार कल्याणासाठी आणि ह्या उदात्त भावनेने जे वीर लढतात विजयश्री त्यांच्या पायासमोर येऊन नतमस्तक होतें. त्यामुळेच स्वराज्याचा पाया घट्ट रोवला गेला. पुढे धाकल्या छत्रपतीनाही त्याचा सुदुपयोग झाला, याच गमक राजांच संघटन कौशल्य होय.
महाराजांविषयी जितक लिहावं तितक कमीच आहे. पण थोडक्यात आवरतं घेत हा आवडत्या विषयाला विराम देतो.
थ्रेड कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आपले विचार याला जोडता येत असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की जोडा जय शिवराय.
मूळ बीडचे विजय बाळासाहेब गिते-पाटील हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. इतिहास वाचन आणि समीक्षा हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.
Thank you मुक्तपीठ