राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन साहित्याच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेची विदर्भ प्रांताची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून, संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या कार्यकारिणीला मान्यता देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक अँड. लखनसिंह कटरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भ प्रदेश महामंत्री म्हणून विधिज्ञ,सामाजिक कार्यकर्ते आणि कवी अँड. सचिन नारळे हे कार्यभार सांभाळणार आहेत.
अध्यक्षपदी निवड झालेले अँड लखनसिंह कटरे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातून राजपत्रित अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून सध्या गोंदिया जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. त्यांचे मराठी आणि हिंदीत १४ ग्रंथ प्रकाशित झाले असून आगामी ६ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले असून राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे मानद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ वाङ्मय सेवेसाठी त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
कार्याध्यक्षपदी निवड झालेले अविनाश पाठक हे गत ४५ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सेवा दिल्या आहेत. रामटेकच्या गडावरून या वाङ्मयीन नियतकालिकाचे त्यांनी ८ वर्ष संपादन केले असून या नियतकालिकाच्या सर्वच दिवाळी अंकांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. अविनाश पाठक यांची आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली असून १५ व राजकीय कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पत्रकारिता आणि साहित्य विश्वातील प्रदीर्घ सेवेसाठी त्यांनाही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. समाजसेवेच्या क्षेत्रातही अविनाश पाठक सक्रिय असून रोटरी क्लब, भारत विकास परिषद, राजाराम वाचनालय, जगदंबा देवस्थान समिती अश्या विविध संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. सध्या पंचनामा न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनलचे ते मुख्य संपादक असून साप्ताहिक बळवंत (रत्नागिरी) चे संपादकीय सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.
महामंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे अँड. सचिन नारळे हे उच्च न्यायालयात विधिज्ञ म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक संघटनांमध्येही ते सक्रिय आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक विषयांवर प्रासंगिक लेखन केले असून अथांग या टोपणनावाने त्यांच्या अनेक कविताही प्रसिद्ध झाल्या आहेत.
विदर्भ प्रांताचे अन्य पदाधिकारी असे आहेत –
- उपाध्यक्ष- महेश अंबोकर, डॉ अमृता इंदुरकर
- संघटनमंत्री – मनोज वैद्य (कार्यालय व्यवस्थापन)
- सर्वेश फडणवीस (प्रचार-प्रसार आणि समाजमाध्यम )
- अन्य भाषा संपर्क – डॉ. मंजुषा कानडे
- कार्यकारिणी सदस्य – डॉ. प्रसन्न शेंबेकर, डॉ. प्रगती वाघमारे,राजा धर्माधिकारी, डॉ. अबोली व्यास, मयुरेश गोखले
कार्यकारिणीत विदर्भातील अकराही जिल्ह्यातील प्रतिनिधी घेण्यात आले असून ते असे आहेत
- नागपूर – डॉ. स्वाती मोहरीर, वर्धा – अँड. अनंत साळवे; यवतमाळ – डॉ. विजय देशपांडे, वाशीम – आशिष तांबोळकर
- बुलढाणा – डॉ. अर्चना देव, अकोला – मोहिनी मोडक, अमरावती – विष्णू सोळंके, भंडारा – मंजुषा साठे, गोंदिया –
- गोवर्धन बिसेन, चंद्रपूर – प्रशांत आर्वे, गडचिरोली – डॉ. संदीप लांजेवार
- मार्गदर्शक – लक्ष्मणराव जोशी, अनिल शेंडे, प्रकाश एदलाबादकर, डॉ. छाया नाईक, नामदेव कांबळे, चंद्रकांत लाखे, विवेक घळसासी, सुनील गावपांडे (निवृत्त ब्रिगेडिअर)
या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षासाठी राहणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ख्यातनाम साहित्यिक प्रवीण दवणे, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक, उपाध्यक्ष नितीन केळकर प्रदेश महामंत्री डॉ. बळीराम गायकवाड आणि प्रदेश संघटनमंत्री सुनील वारे प्रभृतींनी या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सदस्यांचे अभिनंदन केले असून त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.