डॉ. अजित जोशी
महाराष्ट्रात पोलिस अधिकारी, केंद्रीय यंत्रणा, सरकार आणि अर्थात विरोधी पक्षनेते, यांनी मिळून जो गोंधळ चालवलेला आहे, त्याची मुळं २०१४ ते २०१९ च्या फडणवीस कारभारात आहेत, हे समजून घ्यायला हवं.
फडणवीस मुख्यमंत्री झाले, ते स्वतःच्या नव्हे, तर दिल्लीच्या पुण्याईने. महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात झालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला काहीतरी जनाधार होता.गट होता. कधी 10, तर कधी 20 असे।आमदार होते, जे व्यक्तिशः नेत्याशी निष्ठावान होते. 2 ते 3 जिल्ह्यात तरी प्रभाव होता. फडनवीसांकडे यातलं काहीच नव्हतं. दिल्लीचा आशीर्वाद ही त्यांची एकमेव कमाई होती. सत्तेत आल्यावर पृथ्वीराज बाबांसारखा स्वतःचा पाया निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. उलट पद मिळाल्यावर त्यांनी पद्धतशीरपणे पक्षांतर्गत विरोधकांना संपवलं. ज्यांनी अनेक दशकं विरोधी पक्षात असताना भाजप वाढवली, त्यांच्या जागी बाहेरच्या पक्षातून आलेले दलाल किंवा जनाधार नसलेले नेते मोठे व्हायला लागले. दुसरीकडे मोदींप्रमाणेच त्यांनी मंत्र्यांना निष्प्रभ करून अधिकाऱ्यांची ताकद वाढवली. मुख्यमंत्री कार्यालयातले विशेष अधिकारी सत्ता गाजवायला लागले. तिसरं म्हणजे माध्यमांमध्ये आपली आरती ओवाळली जाईल, अशी एक लॉबी उभी केली (ज्याला चेष्टेने ‘लष्कर-ए-देवेंद्र’ असं नाव मिळालं.) खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांच्या आजूबाजूला जमलेली प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड, चंपा असे नेते; सीएमो कार्यालयातले ज्यादा शहाणे तरुण, शुक्लानसारख्या अधिकारी; ठराविक पत्रकार (आणि अर्थात वहिनी!) अशी एक मोठी गॅंग ५ वर्षं राज्य चालवत होती. यातल्या कोणाचाच जनतेशी कनेक्ट नव्हता, हे महत्त्वाचं!
२०१९ ची निवडणूक मोडींप्रमाणेच फडणवीसांनी स्वतःच्या जीवावरही लढली. एकत्र लढून, लोकसभेतल्या भव्य विजयाची पार्श्वभूमी असून, विरोधक घायाळ आणि निष्प्रभ असून जागा कमी झाल्या. फडणवीसांचा कच्चा जनाधार उघडा पडला. मोदींचा आशीर्वाद, यापलीकडे त्यांचं राजकीय कर्तृत्व काही नाही, हे सिद्ध झालं. यातून त्यांची भाजपमधली आणि मोदींच्या नजरेतली ताकद कमी झाली. महाविकास सरकार जितकं स्थिर होत जाईल, फडणवीस तेव्हढे कच्चे पडत जातील. सध्याचं वादळ उठायच्या आधीही भाजपात थोडीशी गळती लागलेली होतीच. मविआ सरकार स्थिर आहे, अशी भावना राजकीय वर्गात जितकी बळावेल, तेवढी ही गळती वाढेल. सामान्य लोकांत जेव्हढी वाढेल, तेवढे फडणवीस विस्मृतीत जातील. त्यांच्यासोबतच त्यांची पक्षातली चौकडी, अधिकारी, पत्रकार (आणि अर्थात वहिनी!) यांचेही दिवस फिरतील, कारण त्यांना स्वतंत्र अस्तित्त्व शून्य आहे! थोडक्यात हे सरकार सतत अस्थिर राहावं, हे नुसतं फडणवीसांच्या हिताचंच नाही, तर जीवनमरणाचा प्रश्न आहे. हे सरकार पडलं नाही तरी चालेल, पण स्थिरावायला द्यायचंच नाही, हेच त्यांचं ध्येय आहे.
सुशांतसिंगची आत्महत्या खून सिद्ध होत नाही, पालघरच्या साधूंच्या हत्येमागे कोणतेही धार्मिक धागेदोरे मिळत नाहीत. कोरोना हातळणीबद्दल दूषणं देता येत नाही. राज्यपाल गाठीशी बांधूनही आमदार फुटत नाहीत. 6.5 जीबीच्या रेकॉर्डिंगमध्ये एकही गुन्हा सिद्ध होत नाही. अंबानींच्या बाहेर सापडलेल्या गाडीने पान टपरीलाही धोका नाही, परमबीर सिंगचे आरोप एकतर अतिशयोक्त आहेत किंवा सोयीच्या उशिराने केलेले… गेल्या वर्षभरात इतकी आकांडतांडवं करूनही निवडणुकीत 144 जागा मिळवायचा आत्मविश्वास अजूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला आलेला नाही. पण हे सगळं फडणवीस आणि कंपूच्या राजकीय अस्तित्त्वासाठी आवश्यक आहे आणि म्हणून येत्या 3 वर्षातही असे प्रयत्न होतच राहणार आहेत…!!
(डॉ. अजित जोशी हे राजकीय विश्लेषक असून चालू सामाजिक राजकीय घडामोडींवर नियमित परखड भाष्य करण्यासाठी ओळखले जातात.)