मुक्तपीठ टीम
पुण्यात आज होणारा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता वशाटोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले होते. नियोजित कार्यक्रमापत्रिकेनुसार या कार्यक्रमाची सुरुवात आज होणार होती. मात्र राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या सुचनेनंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र यावर्षी यावर कोरोना संकटाचे सावट आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे प्रमुख नेते उपस्थित राहणार होते.
वादाच्या भोवऱ्यात वशाटोत्सव
यावेळी वशाटोत्सव दोन कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पहिलं होतं मांसाहारासाठी गाजणाऱ्या वशाटोत्सवात ‘संगीत संत तुकाराम’ हे नाटक आयोजित करण्यात आलं होतं. मात्र वारकरी संप्रदायाकडून आक्षेप घेतला गेला. त्यामुळे वशाटोत्सवात आयोजित हे नाटक रद्द करावं लागलं.
आता कोरोनामुळे शिवजयंतीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले जात असताना राष्ट्रवादीशी संबंधित वशाटोत्सवचा जोरदार प्रचार सुरु होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट विरोधाची भूमिका घेतली. त्यानंतर स्वत: शरद पवारांनी आजचा वशाटोत्सव रद्द करण्याची सूचना केली.
पुण्यातील कोथरुडमधील चांदणी लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार होता.