मुक्तपीठ टीम
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.