Saturday, May 24, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
in featured, सरळस्पष्ट
0
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील पादक!!


तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट 

 

वाळवी माहित आहे ना वाळवी. माहित नसेल असं होणारच नाही. एकवेळ चांगलं माहित नसतं पण वाईटाची माहिती असतेच असते. वाळवीचंही तसंच आहे. आधी कळत नाही. वाळवी लागलीय…वरून सारं काही छान छान दिसत असतं. नंतर कधीतरी वरचा टवका पडतो आणि कळतं आतमध्ये तर वाळवीनं सारं पोखरून टाकलं आहे. पोकळ झालंय सर्व. डोलारा कधीही कोसळेल. पत्त्याचा बंगलाही मजबूत म्हणता येईल, असं सारं काही कमकुवत होऊन गेलंय. फुंकरीचीही गरज नसेल तसं वाळवी सारं काही पोखरून संपवते…वाळवी लागण्याला त्यामुळेच तर सारे घाबरतात. पण ती दिसत नसते तोपर्यंत बेपर्वा राहतात. दिसते तोपर्यंत सारं संपलेलं असतं. किमान त्यावेळी जरी हालचाली केल्या तर पुढचं नुकसान टाळता येतं. नाही तर वाळवी कुणालाच सोडत नसते…घरातील वस्तू, घर, वाडा, इमारत…अहो एवढंच काय गावच्या गाव वाळवी संपवून टाकते.
आज वाळवी वाळवी करायचं कारण वैष्णवी हगवणे प्रकरण. या प्रकरणामुळे आपल्या समाजाला वाळवी लागल्याचं उघड झालंय. मात्र ते एकच प्रकरण नाही तशी अनेक प्रकरणं. अवघ्या पंधरा रुपयांच्या बिस्किटांसाठी आत्महत्या केलेला अल्पवयीन मुलगा. अवघ्या वीस हजारांच्या कर्जामुळे आत्महत्या करणारा बुलढाण्याचा शेतकरी. एकीकडे स्वत:चं जीवन संपवून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे हे सारे. त्यांच्यासाठी जीवन पोखरणारी वाळवी ठरली आपली व्यवस्था. तर दुसरीकडे उत्तरेतील यूट्युबर ज्योती मल्होत्रा. ऐशाआरामात जगण्यासाठी पैसा पैसा पैसा करणाऱ्या झगामगा मला बघा व्यवस्थेतील वाळवी. पैशासाठी देशाची सुरक्षा पोखरणारी वाळवी. आणखीही बऱ्याच घटना आहेत. पण सध्या याच पाच वाळवी घटनांवर बोलूया. आणि त्यानंतर आजही जागं असलेलं माणूसपणही अनुभवूया.
पुण्याची वैष्णवी हगवणे. आता कुठं जीवन बहरण्याच्या उंबरठ्यावर पोहचलेली तरुणी. पण ज्यांच्यावर तिनं आपल्या पुढच्या जीवनासाठी विश्वास टाकला, त्या सासरच्यांनीच तिच्या विश्वासाचा घात केला. जीवन अकाली संपलं त्या गोड मुलीचं. पती नावाचा नालायक. नराधम वाटावा असा सासरा. स्त्री म्हणायला कलंक वाटाव्या अशा ननंद आणि सासू. आपल्या पत्नीलाही साथ देऊ न शकलेला दीर. सारं हगवणे कुटुंबच माणूस म्हणताच येणार नाही असं. पण मुक्तपीठवर आज आपल्याला जे झालं तेवढ्यापुरतंच मर्यादित बोलायचं नाही, तर ते का झालं याचाही वेध घ्यायचा आहे. तसंच या सैतानांचा माज वाढवण्यास कारणीभूत ठरलेले राजकारणी, या अमानुष घटनेनंतरही स्त्रीयांनाच उपदेशाचे डोस पाजणारे माध्यमातील काही अतिशहाणे आणि इतर सर्व भेकड कुजबूजे…या साऱ्यांचाच समाचार घ्यायचा आहे. त्याच बरोबर ही एकच घटना नाही तर अशाच स्वरुपाच्या आणखीही काही घटनांवर आज बोलायचं आहे, कारण हे सारं जे घडतंय ते उगाच नाही. त्यामागे आपलंही दुर्लक्ष आहे का? यावर आत्मपरीक्षणही करायचं आहे. हे करणं आवश्यक आहे. कारण हे सारं घडतंय…आपल्या समाजव्यवस्थेलाच पोखरतंय…त्यामागे विकृतीची वाळवी आहे. होय विकृतीची वाळवी.
वैष्णवीच्या घटनेत काय दिसतं. काय खुपतं. मुळात जास्त चौकशी न करता दिखाऊ झगमगाटाला फसून मुलीचे आईवडिल कसायाच्या घरात आपल्या कोकराला बांधतात. हगवणेंचं घर म्हणजे लालची वखवखलेल्यांची हगणदारीच. मोठ्या सुनेला मयुरीलाही त्यांनी छळलं. पण ती स्त्री हिंमतवाली. तिच्या घरचेही अभिमान बाळगावे असे. त्यांनी मयुरीला साथ दिली. हगवणेंनाच चोप दिला. मयुरी माहेरी गेली. सुखी राहिली. वैष्णवी मात्र दिल्या घरी सुखी राहायच्या नावाखाली छळ सोसत राहिली. तिच्या घरच्यांचा दोष नाही. मुलीला सुखी पाङण्यासाठी ते वखवखलेल्या हगवणेंचा तोबारा भरत राहिले. विकृत नराधमांना सॉफ्ट टार्गेट वाटले. त्यात तो निलेश चव्हाण. विकृतीचा पुढचा किळसवाणा किडा. त्यानेही यात तेच केलं जे माणूस करणार नाही. आपल्या पत्नीला विकृतीनं छळणारा. दुसऱ्याच्या घरात पापाचा उच्छाद मांडणारा. त्यात मग ते दुरचे नातेवाईक आयजी साहेब. ज्यांनी स्थानिक पोलिसांना सौम्य कलमं का लावली, का नराधमांविरोधात कडक कारवाई नाही, असा जाबच विचारला नाही. त्यांना काय बोलायचं! त्यांनीच स्वत:ला विचारावं खाकीशी इमान राखलं का?
आपले राजकीय नेते. लाडक्या बहिणींच्या मतांच्या भिकेवर सत्ताधीश झालेल्या भाऊ-भाई आणि दादांना लाज वाटावी असंच सारं घडतंय. दादा तर काय! बीडमध्ये त्यांची दादागिरी चालत नाही. आता पुण्यातही ते वाळवीवाले दादा वाटतात. हगवणेंच्या लग्नात ते गेले होते. आलिशान हुंडा गाडीची चावी त्यांनीच पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या नवरोबाला दिली. फक्त जोक केला आणि विषय सोडला. तिथं त्यांच्या पक्षाच्या माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणेनं बैलापुढे गौतमी पाटीलला नाचवलं होतं. पत्रकारांनी विचारलं, तेव्हा राजेंद्र हगवणे मागेच होता. दादांनी फालतू पंच मारला आणि राजेंद्रसह सारे फिदीफिदी हसलेले. हीही विकृतीची वाळवीच!
अजित पवारच नाही माननीय शरद पवार, आता आक्रमकतेनं संवेदनशीलतेनं न्यायासाठी बोलणाऱ्या सुप्रियाताई सर्वांनीच विचार करावा त्यांच्या पुरोगामी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही विकृतीची वाळवी कशी!  का गावागावातल्या माणसांना नावासह ओळखणाऱ्या साहेबांना त्यांच्यातील विकृतीच्या वाळवीचा धोका कळत नसतो!  विचार झालाच पाहिजे. नाहीतर वाळवीसाठी त्यांनाही जबाबदार मानलं जाईल. कारण एकीकडे स्त्रीसक्षमीकऱणाचं श्रेय घ्यायचं आणि दुसरीकडे स्त्रीयांचं जीवन पोखरणाऱ्या वखवखलेल्यांना पदाधिकारी म्हणून सन्मान द्यायचा हे एकाचवेळी कसं चालेल!
वैष्णवीचा मृत्यू मराठी माणसांना अस्वस्थ करत असतानाच काहींची विकृत कुजुबुजही किळस आणत आहे. वैष्णवीनं का सहन केलं, का लग्न केलं, तिचे घरचे सासरच्यांचा छळ गप्प राहून का सहन करत होते, यावर मुलीचे पारंपारिक आईबाप म्हणून विचार केला तर कळू शकेल. आपल्यासारखे अरेला कारे करायला लेकीला शिकवणारे आईबाप सर्वच नसतात. तसा भाऊ आणि आई मयुरीला लाभले. ती नडली. वाचली. पण वैष्णवीचे तसे नव्हते, हा काही त्यांचाही दोष नाही. त्याचा फायदा घेत कुजबुजीचा विकृत कंड क्षमवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. ही सुद्धा विकृतीची वाळवीच. अशी स्त्रीयांविषयी कुजबूज करणारी सडक्या मेंदूंची अवलाद काही न्यूजरूममध्ये, पत्रकारितेलाही पोखरतेय. असं कोणतंही प्रकरण झालं की तुम्हाला माहित नाही हो, मी सांगतो किंवा सांगते तुम्हाला करत बरळलं जातं. शौचालयाच्या टाकीतून घाण फसफसावी तसं सडक्या मेंदूतून काही फसफसवणाऱ्यांनाही विकृतीची वाळवीच म्हटलं पाहिजे. हा व्हिडीओ करत असतानाच एका जेन झेड तरुणानं एक पोस्ट पाठवली. मराठीतील एका संपादकांची. त्या पोस्टचा रोख असा की जणू वैष्णवी असो की इतर हुंडाबळीची प्रकरणं त्यासाठी जबाबदार कोण तर फक्त स्त्रीयाच!
त्यावरून आठवले, तरुण वयात मी बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरेंना भेटलो होतो. एखाद्या नबाबासारखे ते गादीवर पहुडले होते. मी तेव्हा रिपोर्टरची नोकरी करतानाच स्वत:चं साप्ताहिकही चालवायचो. मालक, प्रकाशक, संपादक असं सर्व काही. बराच वेळ बोलणं झालं, मग त्यांच्या लक्षात आलं, हा कोण ते विचारलंच नाही. सोबतचे ज्येष्ठ छायाचित्रकार रवींद्र नगुसिंह यांनी ओळख करून दिली. हा तुळशीदास भोईटे रिपोर्टर आहे आणि एका साप्ताहिकाचा संपादकही. जयदेव हसले. म्हणाले हा ठिक वाटतो. नाहीतर आजकाल पादकच जास्त झाले, दुर्गंधी सोडणारे. संपादक कमीच आहेत! खरंतर त्यावेळीही आणि आताही जयदेव ठाकरेंनी मराठी पत्रकारितेला प्रमाणपत्र द्यावं एवढी वाईट वेळ आलेली नाही. पण विकृतीची फसफस पाहिली की वाटतं ते काहींच्या बाबतीत तरी बरोबरच बोलले. आजही लागू होतं. संपादक कमी आणि भपकारा सोडणारे पादकच जास्त!
पैशासाठी वाट्टेल ते कऱणारे, सैतानासारखे वागणारे आपल्या महाराष्ट्रातील हगवणे कुटुंब. तिकडे हरियाणात पैशासाठी देशाची सुरक्षा विकण्याचा आरोप असणारी यूट्युबर ज्योती मल्होत्रा. तिनं पाकिस्तानला महत्वाची माहिती आपल्या व्हिडीओंद्वारे पुरवल्याचा आरोप आहे. पैशासाठी माणसं वाट्टेल ते करतात! किती लागतो असा पैसा? का एवढं ऐशोआरामात जगायचं वेड! खरंतर व्यसनच, नैतिकता वगैरे सोडाच पण  किमान देशाचा तरी विचार! सोशल मीडियावरचा झगमगाट, झगा मगा मला बगा यांचा घात करतोय! गद्दार शब्दही सौम्यच म्हणावा असं ती वागली आहे. आजूबाजूला पाहा. सोशल मीडिया पोस्ट पाहा. अनेकांच्या पोस्ट पाहून, फेसबूकवर विचारशील पोस्टला येणारे लाईक आणि झगामगा पोस्टवर पडणारा लाईक्सचा पाऊस याचा विचार केला तर आपलंही चुकतं हे मान्य करावं लागेल. आलिशान गाडी, आलिशान हॉटेल, आलिशान राहणीमान आणि स्वाभाविकच महागडे कपडे हे असं झगमगाटावालं लक्झरी दिखावू लाईफच न्यू नॉर्मल होऊ लागलं आहे. आत्मपरीक्षण खरंच गरजेचं आहे. सर्वांनीच करावंच असं.
एकीकडे हगवणे, मल्हात्रा. तर दुसरीकडे कोलकात्यात पंधरा-वीस रुपयांच्या कुरकुरे पाकिट चोरल्याचा आरोप झालेल्या मुलाने आत्महत्या केली. त्याने चोरी केली नाही केली. पण दुकानदाराने जाहीररीत्या केलेली त्यांची जनसुनावणी आणि ते ऐकल्यावर आईनंही तासणं त्या मुलाला जिव्हारी लागलं. त्यानं स्वत:ला संपवलं.
आपल्याच महाराष्ट्रातील अकोल्याचे शेतकरी देवानंद सुखदेव इंगळे यांनी स्वत:ला संपवलं. का तर त्यांच्यावर वीस हजाराचं कर्ज होतं. नैसर्गिक आपत्तीनं ते खचले होते. का असं घडतं का आपण आधार देऊ शकत नाही. त्या मुलाला, या शेतकरी मित्राला. आपल्या व्यवस्थेतील विकृतीची वाळवी इथंही मनाला पोखरते.
आपला महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर आणि आगरकरांचा. अशी पुरोगामी पराक्रमाची परंपरा. पण काही भेकड लोभी सैतानांची विकृती सारं संपवू पाहतेय. विकृतीची ही वाळवी संपूर्ण समाजाला पोखरतेय. ती लवकर संपवावी लागेल. वाळवीचा अंत नाही केला तर तो आपल्या समाजव्यवस्थेच्या अंताचा आरंभ ठरू शकेल.
जाता जाता एक माणूसपण दाखवणारी बातमी. लेफ्टनंट शशांक हे उत्तर सिक्कीमच्या उंच भागात तैनात होते. जिथे एका ऑपरेशन दरम्यान त्यांचा एक सहकारी नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी शशांकने नदीत उडी मारली. त्याने दुसरे एक सहकारी पुकर काटेल यांच्या मदतीनं सहकाऱ्याचा जीव वाचवला. पण तेवढ्यात प्रवाहाचा जोर वाढला. लेफ्टनंट शशांक तिवारी स्वतःला वाचवू शकले नाहीत. ते वाहून गेले. काही वेळानं त्यांचा मृतदेह सापडला. जीवाची पर्वा न करता सहकाऱ्याचा जीव वाचवणाऱ्या लेफ्टनंट शशांक तिवारी यांना मुक्तपीठचा तिरंगा सलाम. असं माणूसपण वाढवणं. माणसांशी माणसांसारखं वागण्याची सकारात्मकताच विकृतीच्या वाळवीला अटकाव करू शकेल. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला शशांक तिवारींसारखं माणूस व्हायचंय की हगवणे, मल्होत्रांसारखं वाळवी सारखं समाजाला पोखरायचंय…
(लेखक मुक्तपीठचे संपादक आहेत, गेली ३३ वर्षे टीव्ही, प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये सक्रिय आहेत. रिपोर्टर ते मॅनेजिंग एडिटर अशा अनेक स्तरांवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. फिल्ड रिपोर्टिंग, राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी ते ओळखले जातात.  संपर्क – 9833794961 X – @tulsidasbhoite)
व्हिडीओ पाहा: 

Tags: jyoti malhotrapunevaishnavi hagawaneyoutuber spyज्योती मल्होत्रापुणेवैष्णवी हगवणे
Previous Post

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!