गौरव साळी / जालना
जेथे इच्छा असते तेथे मार्ग असतोच असतो. काहीवेळा चित्रपटासारखे चमत्कार प्रत्यक्षात घडतात.जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात थ्री ईडीयट चित्रपटातील दृश्यासारखी व्हॅक्यूम प्रसूती यशस्वी करण्यात आली आहे.तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या या प्रसूतीला यश आलं आहे. या व्हॅक्यूम प्रसूतीनंतर महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील 21 वर्षाच्या गोदा गुडेकर यांना जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं.पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे.हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका हा वाकडा आहे.त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं.शिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या शरीरात प्लेटलेटही फक्त 78 हजार इतक्याच असल्यानं प्रसूती नॉर्मल आणि सीझर करणं देखील मोठं आव्हान होतं.याशिवाय भूल देणे देखील एक आव्हान बनलं होतं.त्यामुळे डॉक्टरांना या सर्व प्रक्रीयेसाठी 2 तास लागले.अखेर उपस्थित तज्ञ डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूम पद्धतीने प्रसूती केल्यानं महिलेच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.प्रसूती झालेल्या महिलेसह बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.