मुक्तपीठ टीम
लस घेतली तरी काय उपयोग? लसीकरणाविरोधात घातक अफवा पसरवत संभ्रम निर्माण करणाऱ्यांना सध्या मुंबईतील कोरोना उपचारात येत असलेले अनुभव प्रभावी उत्तर देणारे आहेत. लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेले संसर्ग झाला तरी अवघ्या पाच दिवसात बरेही होत आहेत. तसेच त्यांच्यापैकी अनेकांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येत नाही. याउलट सध्या मुंबईत ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागत आहे, त्यांच्यापैकी ९६ ट्कके रुग्ण हे लसीकरण न केलेले रुग्ण असल्याचे मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उघड केलं आहे.
लसीकरणाच्या दोन्ही डोसचा फायदा!
- मुंबईत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत, अशांपैकी फार कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
- अशांना रुग्णालयात दाखल करावं लागलं तरी पाच दिवसांत हॉस्पिटलमधून सोडले जात आहे.
- मुंबईतील जवळजवळ संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले असले तरी किमान ११ टक्क्यांनी अदयाप दुसरा डोस घेतलेला नाही.
- मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजन बेडची गरज नाही.
ओमायक्राॅनचा कहर, लसीकरणाअभावी ऑक्सिजनवर अवलंबित्व!
- जे लोक अँटी-कोरोनाव्हायरस लसीचा डोस घेत नाहीत त्यांच्यासाठी कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार घातक ठरत आहे.
- मुंबईतील रुग्णालयांमधील जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्यापैकी ९६ टक्के जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
- या उलट ज्यांनी दोन्ही डोस घेतलेत, त्यांच्यापैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.
- मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलेल्या की, गुरुवारपर्यंत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या १९०० कोरोना रुग्णांपैकी ९६ टक्के रुग्ण हे लस न घेतलेले आहेत.
मुंबईतील या अनुभवामुळे लसीकरणाविरोधात अपप्रचार करणाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशांमुळे एक वर्ग लसीकरणापासून दूर राहत असावा, अशी शक्यता आहे.