मुक्तपीठ टीम
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. एसडीआरएफ, अग्निशमन दलासह बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्याच्या लाटेत अनेक स्थानिक रहिवासी वाहून जाण्याची भीती आहे. अद्याप अधिकृतपणे यावर काहीही बोलले गेलेले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी यंत्रणा गतिमान करतानाच अफवा आणि जुने व्हिडीओ न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
हिमकडा कोसळल्याने वीज प्रकल्पांचे नुकसान
एसडीआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा प्रकल्पांतील सुमारे दीडशे लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. वीज प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगितले आहे की जवळपास दीडशे जणांची माहिती मिळत नाही आहे. लोकांना बाहेर काढण्याच्या सुचना पथकाला देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे घटनास्थळी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे बाधित क्षेत्रात अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी ट्वीट केले की, ‘जर तुम्ही बाधित क्षेत्रात अडकले असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास आपत्ती ऑपरेशन्स सेंटर क्रमांक १०७० किंवा ९५५७४४४४८६ वर संपर्क साधा. कृपया घटनेबद्दल जुन्या व्हिडिओंवरून अफवा पसरवू नका. ‘
हानी टाळण्यासाठी दक्षता
- ऋषिकेशमधील सर्व घाट रिकामे करण्यात आले आहेत.
- राफ्टिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
- पोलीस संपूर्ण परिसरात सावधगिरीच्या सुचना देत आहेत.
- घाटाच्या बाजूला कॅम्पमध्ये लोकांना जाण्यास मनाई केली जात आहे. पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समध्ये राहण्यास सांगितले आहे.