मुक्तपीठ टीम
नाशिक महामार्गावरील आटगाव ते वाडा मार्गावरील अघई येथील रस्त्यावरील जुन्या पुलाची संरचनात्मक तपासणी व्हीजेटीआय मार्फत करण्यात आली असून सविस्तर अंदाजपत्रकानुसार त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य दौलत दरोडा यांनी आटगाव ते वाडा मार्गावरील अघई येथील रस्त्यावरील जुन्या पुलाचे लोखंडी कठडे तुटले असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले की, हा पुल ६० वर्ष जुना असून सध्या एकेरी वाहतुक सुरू आहे. या पुलाची नियमित तपासणी केली जाते. त्याच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती मुंबई महापालिकेच्या तानसा विभागामार्फत करण्यात आली आहे.
पुलाची संरचनात्मक तपासणी व्हीजेटीआय मार्फत फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली आहे. त्यात मोठ्या स्वरूपाची दुरुस्ती सुचविण्यात अली असून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजनुसार त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार असून मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रईस शेख, योगेश सागर यांनी भाग घेतला.