मुक्तपीठ टीम
वाढती बेरोजगारीमुळे देशभरातील तरुणनच नाही तर परदेशातील सुशिक्षित तरुणही बेरोजगारीच्या कचाट्यात सापडले आहेत. दरम्यान, बेरोजगारीशी संबंधित एक अत्यंत विचित्र प्रकरण समोर आले आहे. ऑक्सफोर्डसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने बेरोजगारीला कंटाळून आपल्याच पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या ४१ वर्षीय व्यक्तीने पालकांकडे आयुष्यभरासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
फैज सिद्दीकी नावाच्या या व्यक्तीने ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्याने वकिलीचे प्रशिक्षणही घेतले आहे. असे असूनही तो बेरोजगार आहे. त्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचे फैज याने सांगतिले. याचे कारण सांगताना फैज म्हणाला की, “लहानपणापासूनच त्याची तब्येत खराब आहे. ज्यामुळे त्याच्या अभ्यासावर आणि जीवनावर मोठा परिणाम झाला आहे”. त्याचबरोबर फैज असेही म्हणतात की, “जर त्यांच्या पालकांनी त्यांना मदत केली नाही तर त्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होईल”.
फैज सिद्दीकीचे पालक दुबईत राहतात. फैजचे वडिल जावेद हे ७१ वर्षांचे आहेत आणि आई रक्षांदा ६९ वर्षाची आहेत. इतके म्हातारे असूनही ते दरमहा सुमारे १००० डॉलर्स फैजला पाठवतात. इतकेच नाही तर ते फैजचे इतर खर्चदेखील पार पाडतात ज्यात त्याच्या इतर बिलांचा समावेश आहे. फैजच्या पालकांच्या म्हणण्यानुसार लंडनच्या हेडी पार्क भागात त्याचा फ्लॅट आहे. ज्यामध्ये फैज गेली वीस वर्षे राहत आहेत. फैजच्या हेडी पार्क येथील फ्लॅटची किंमत १ मिलयन पौंडहून अधिक आहे.
पालक त्याच्या मागण्यांना कांटाळले
आपल्या मुलाच्या या मागण्यांमुळे त्याचे आई-वडिल कंटाळले आहेत. फैजच्या पालकांचे वकील जस्टिन वारशॉ यांनी म्हटले की, ते गेल्या अनेक वर्षांपासून फैजच्या विचित्र मागण्यांची पूर्तता करत आहेत. परंतु ते आता त्याच्या मागण्यांना वैतागले असून पुढे असे करू इच्छित नाहीत.
तथापि, फैज सिद्दीकी या व्यक्तीने प्रथमच अशा विचित्र प्रकारचा खटला दाखल केलेला नाही. याआधी त्याने ऑक्सफर्ड या प्रसिद्ध विद्यापीठावरही खटला दाखल केला आहे. अमेरिकेच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा हा चांगला नसल्याचा दावा करत फैजने न्यायालयात धाव घेतली होती. फैजने ऑक्सफोर्डकडून १ मिलियन पौंड हानीची मागणी केली होती. पण न्यायालयाने फैजचा खटला फेटाळून लावला होता.