मुक्तपीठ टीम
हिंदमाता परिसरात नेमची येतो पावसाळा आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तशी नेहमीचीच. दशके लोटली पण पावसाळ्यातील या समस्येपासून हिंदमाता परिसराची मुक्तता काही झाली नाही. मात्र, आता ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड या तीन ठिकाणी भूमिगत टाक्यांची कामे सुरु आहेत.
हिंदमाता परिसर खोलगट असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या कामाची नुकतीच पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शवेलारसू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.
पाणी साचण्याच्या समस्येवर भूमिगत उपाय
- जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच मोठ्या भरतीच्या कालावधीमध्ये या भूमिगत टाक्यांचा विशेष उपयोग होईल.
- या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
- या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील.
- मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
- या भूमिगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या आच्छादित केल्या जातील.
- मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा भूमिगत टाक्या बांधण्यासाठी आणखी संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.
पाहा व्हिडीओ: