मुक्तपीठ टीम
कोरोना उद्रेकाच्या काळातही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्य सरकार या घटनांकडे गांभीर्याने पहात नसल्याने महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. राज्य सरकारने महिलांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता या घटनांतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात सध्या नको नको ते घडतं आहे. नागपूरमध्ये एका डॉक्टरने रुग्णालयामध्ये शारीरिक सुखाची मागणी करुन महिला डॉक्टरावर रूग्णालयामध्येच अत्याचाराचा प्रयत्न केला. कोरोना उपचार केंद्रातही माता भगीनींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत.
लातूर येथे एक महिला रुग्णालयाच्या दारात आपल्या पतीला तोंडाने श्वास देऊन त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होती. तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अशा घटना टाळण्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणेने सतर्कता दाखवावी, असेही खापरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.