मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजी छत्रपती यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली असून दोघांनी गळाभेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली. मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची असल्याचं उदयनराजे म्हणाले.
येत्या १६ तारखेला मराठा क्रांती मूक आंदोलनाची हाक संभाजीराजेंनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांनी आज उदयनराजेंची पुणे येथे भेट घेतली. गेले अनेक दिवस छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. त्यापूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी दौरा केला आहे. जनसामान्यांची मते जाणून घेऊन, ती शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचे काम छत्रपती संभाजीराजे करत आहेत.
ह्या बैठकीत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासारख्या महत्वूर्ण विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रातील संपूर्ण समाज एकवटला असून, संभाजीराजेंनी तो एक करण्यासाठी जो पुढाकार घेतला, त्याचे कौतुक होत आहे. करवीर छत्रपती आणि सातारा छत्रपती एकच असल्याचा महत्वूर्ण संदेश आजच्या या बैठकीतून देण्यात आला.