मुक्तपीठ टीम
कोकणात होत्याचं नव्हतं करणारा महापूर. अतिवृष्टीनं असं झोडलं की सोशिक असणारा कोकणी माणूसही हादरून गेला. महापुराच्या लाटांनी त्याचं जीवनच हलवून टाकलं. त्यामुळेच आपल्या कोकणाला पुन्हा उभं करण्यासाठी अनेक पुढे येत आहेत. त्यात ट्विटरकरही मागे नाहीत.
खरंतर ट्विटर म्हटले की अनेकांना ट्रोलिंगच आठवते. पण याच ट्विटरच्या २८० शब्दांची शक्ती ही फक्त उपद्रवी नसून त्याहीपेक्षा जास्त मोठी रचनात्मकही असल्याचे अनेकदा दिसून येते. आता महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीच्यावेळीही ट्विटरकर मदतीसाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.
ट्विटरकर प्रतिक पाटील यांनी त्यांच्या यूथ फॉर डेमोक्रॅसी या संघटनेमार्फत मदतीस सुरुवात केली. ट्विटरकरांना आवाहन केलं आणि मदतीचा ओघ वाढत गेला.
प्रतिक यांनी YFD म्हणजे यूथ फॉर डेमोक्रॅसी म्हणजे काय? तेही मांडले. YFD हा मदतीला सदैव धावून येणारा राज्यभरातील परिवार. प्रतिक पाटील आणि सुरज यांनी २०१४मध्ये सुरु केलेल्या YFD चे सहकारी कधीही, कुठेही मदतीला तयार असतात. कोकणावर संकट कोसळताच प्रतिक यांनी ट्विटरवर साद घातली आणि सुरु झाला मदतीचा ओघ.
प्रतिक यांचे ट्विट महाराष्ट्रातील माणुसकी आजही अनलिमिटेड असल्याचे दाखवून देतायत. मराठवाड्यातील औरंगाबादचा सतीश लोकांकडून आलेली मदत गोडाऊनच्या ठिकाणी घेऊन जातो, तर खानदेशातील धुळ्याचे एक शिक्षक आपल्या स्वकमाईतून कोकणाला मदतीचा हात देतात.
युथ फॉर डेमोक्रॅसीची पहिली मदत चिपळूण मध्ये पोहोचली आहे, लोकांना वस्तू द्यायला सुरुवात, मदत गरजू लोकांपर्यंत पोहचतेय याचं सर्व परिवाराला खूप समाधान वाटत आहे, असं त्यांचं ट्वीट वाचलं. तेवढ्यात दुसरं ट्वीट.
मदतीचा दुसरा टेम्पो घेऊन युथ फॉर डेमोक्रॅसी परिवारातील कुलदीप पवार, राहुल जाधव, ओंकार चव्हाण आणि राहुल ताम्हाणे थोड्याचवेळात तुम्ही दिलेली मदत घेऊन चिपळूण मध्ये दाखल होतील. खरंतर आतापर्यंत दाखल झालेही असतील.
प्रसन्न जंगम या ट्विटरकराने ट्वीट केले आणि सर्वांचं ह्रदय हललं. त्यांचे भावोजी चिपळूण चिंच नाका कन्या शाळेच्या शेजारी पोटमाळ्यावर अडकून पडले होते. ३ मुले, २स्त्रीया, ३पुरूष आहेत. अंत्यत तातडीची मदत हवी आहे, अशी हात त्यांनी देताच स्वप्नील धोटे या ट्विटरकराने जयपाल दगडे रेस्क्यूसाठी बोट आणि इतर साहित्य घेऊन उपलब्ध आहेत, असं त्यांच्या संपर्क क्रमांक : 9552656100 सह कळवले.
प्रसन्नने काही वेळातच ट्विट केले, आत्ताच संपर्क झाला आहे. ते मदत कार्य सुरू करतील. त्यांच्याकडे अंत्यत कमी वेळ असल्याने फक्त माहिती घेतली बाकी काहीही बोलणे झाले नाही. सर्व ईश्वर चरणी सोडले आहे. तो नक्कीच कोणाच्या कोणाच्या रूपाने मदत करेल अशी आशा बाळगून आहे.
काही वेळातच प्रसन्नने चांगली बातमी दिली. त्यांचे भावोजी आणि घरातील सर्व तसेच शेजारी चिपळूण पुरात अडकले होते आत्ताच समोरच्या इमारतीत सुखरूप पोहचले आहेत.
ट्विटरकरांची अनलिमिटेड मदत कार्य इथंच संपत नाही. त्यानंतर एक ट्वीट येते ते अॅड. अमेय मालशे, अॅड. प्रसन्न मालशे यांनी केलेल्या आहार-निवास सुविधेची माहिती देणारे.
खेड ते चिपळूण दरम्यान अडकलेल्या लोकांना मदत म्हणून मुंबई गोवा महामार्गावर मालशे कॉम्प्लेक्स दाभिळनाका येथील मॅरेज हॅालमध्ये लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. संपर्क – 8446855868 Airtel, 8626006826 Airtel, 8928803119 Jio
मराठी रिट्विट, मराठी विश्वपैलू या हँडल्सचे मोठं काम!
मराठी रिट्विट @MarathiRT या हँडलचं ट्विटरवर मराठी भाषा, प्रसारासाठी मोठं काम सुरु असतं. ट्विटरवरील मराठीत ट्वीट वाढवण्यात त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचाही वाटा आहे. आपत्तीच्या काळात हे हँडल मदतीसाठीचे ट्वीट प्रमोट करताना दिसत आहे.
थोडक्यात काय तर ट्विटरवर २८० शब्दांची मर्यादा असली तरी ट्विटरकरांची माणुसकी मात्र अमर्याद अशीच आहे.