मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारताला मोठ मोठ्या सेलिब्रिटींसह, नेतेमंडळी मदत करत आहेत. अशाताच आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ११० कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी ट्विट करुन ही रक्कम भारतात कशी पोहोचेल हे सांगितले.
जॅक डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम केअर, एड इंडिया आणि सेवा इंटरनेशन यूएसए या तीन स्वयंसेवी संस्थांना दान करण्यात आली आहे. त्यापैकी केअरला १ कोटी, एड इंडिया आणि सेवा इंटरनेशन यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत.
$15 million split between @CARE, @AIDINDIA, and @sewausa to help address the COVID-19 crisis in India. All tracked here: https://t.co/Db2YJiwcqc 🇮🇳
— jack (@jack) May 10, 2021
ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार सेवा इंटरनॅशनल ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावदी ना-नफा सेवा संस्था आहे. ही संस्था ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर,व्हेंटिलेटर, बीआयपीएपी आणि सीपीएपी मशीन सारख्या जीवनावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी मदत करणार आहे. सर्व उपकरणे देशातील सरकारी रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये वितरित केली जातील.
त्याचबरोबर, कोरोना केअर सेंटर बांधले जातील, केअरकडून प्राप्त झालेल्या निधीतून ऑक्सिजन, पीपीई किट आणि इतर आवश्यक वस्तू प्रदान केल्या जातील.