तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
महाराष्ट्र नव्हे तर अवघा देश कोरोनाशी लढतोय. त्याचवेळी काही सत्तेचा माज दाखवू लागलेत. राग, संताप येतो. प्रत्येकालाच येतो. तुम्ही, मी, आपण सारेच षडरिपूंपासून मुक्त नाही. त्यामुळे राग येऊ शकतो. पण काळ-वेळेचं भान राखणं आवश्यक आहे. त्यातही पुन्हा जेव्हा रागाचं, मोहाचं कारण समाजहितापेक्षा स्वहितात दडलेलं दिसतं तेव्हा ते जास्तच खुपतं. महाराष्ट्रात कोरोना संकटात घडलेल्या काही घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
आमदार अण्णा बनसोडेंचा पिंपरी चिंचवड पॅटर्न
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील एक बातमी बुधवारी सर्वच माध्यमांवर गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबाराची. एका ठेकेदाराचा मॅनेजर आमदारावर गोळीबाराची हिंमत कशी दाखवतो, असा प्रश्न पडला होता. त्यातील गूढ आज उकलले. खरंतर रात्रीच कुजबुज सुरु झाली होती. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह ८ ते ९ जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार यांच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार – ठेकेदार नेमका संघर्ष काय आहे?
• आमदार अण्णा बनसोडे यांचा दावा आहे की त्यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांचे व्यवस्थापक तानाजी पवार यांनी गोळीबार केला.
• पोलिसांनी तसा गुन्हाही दाखल केला.
• आमदारांना त्यांच्या काही माणसांना कामावर लावायचे होते, तसे केले गेले नाही, म्हणून वाद झाला, त्यातून गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला गेला.
• प्रत्यक्षात दुसऱ्या तक्रारीनुसार अँथनी यांच्या कार्यालयात आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यांनी लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेजही आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि त्यांच्या पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार आहे.
• आता तानाजी पवार का पाहिजे होते, तर त्यांना आमदार बनसोडेंनी आधीही फोनवर धमकावले होते. त्यांनीही जशास तसे उत्तर दिले होते. शिवीगाळ करू नका बजावले होते.
• त्यानंतर त्यांना आमदारांच्या कार्यालयात बोलवण्यात आले, पवारांच्या तक्रारीनुसार त्यांना तेथे मारहाण झाली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. त्याला आमदारांवरील गोळीबाराचे स्वरुप देण्यात आले, असा एक्स सर्व्हिसमन असणाऱ्या पवारांचा आरोप आहे.
हेही वाचा: अनुपम खेरांचा खुपणारा माज! सत्तेत कुणीही येवो, पण चिता पेटलेल्या असताना जयघोष कसला?
आता काहींना वाटेल, दोघांच्या नोकरीसाठी आमदारमहोदयांनी एवढे केले असेल तर चांगलंच आहे. तसे म्हणता येत नाही. कारण दोघांच्या नोकरीचे काम आमदारांना अन्य कोणत्याही माध्यमातून करता आले असते. पण त्यांनी आधी वेगळाच मार्ग स्वीकारला. ठेकेदाराच्या कार्यालयात त्यांचे पुत्र, पीए जातात, हल्ला करतात, हे काही चांगला हेतू दाखवत नाही. त्यानंतर त्यांची रेकॉर्डेड कॉलमधील भाषाही आमदारांना शोभणारी नाही. मुळात वाद खरंच नोकरीचा की आणखी काही, हाच खरा तपासाचा भाग. तसे होणार नाही. हा भाग वेगळा.
हे झाले आमदार अण्णा बनसोडेंच्या पिंपरी चिंचवड पॅटर्नचे!
आमदार रणजीत कांबळेचा वर्ध्यातील गांधी’विरोध’गिरी!
दुसरे ते वर्ध्याचे काँग्रेस आमदार रणजीत कांबळे. त्यांचीही रेकॉर्डेड क्लिप आहे. सरकारी अधिकाऱ्याला धमकावत शिवीगाळ करणारी. काय कारण? सरकारी अधिकारी काम करत नव्हते? तसे असते तर आमदारसाहेबांचा संताप समजूनही घेता आला असता. पण तसे नव्हते. काम झालं होतं. पण त्यांच्या मतदारसंघातील कोरोना टेस्ट केंद्राचे काम त्यांना माहिती न देता केले गेल्यामुळे आमदार कांबळेंचा संताप उफाळून आला. खरंतर सरकारी अधिकाऱ्यांनी आमदारांना माहिती दिली पाहिजे. गैर नाही. पण माहिती दिल्याशिवाय अधिकाऱ्यांनी कोरोना टेस्टचे काम केले म्हणून एवढे संतापायचे आणि शिवीगाळ करणे, योग्य नाही. वर्धा ही महात्मा गांधीची भूमी. अहिंसात्मक विरोधाची गांधीगिरी आणि त्याच वर्ध्यात आमदार महोद्यांची गांधी’विरोध’गिरी!
गडचिरोली येथील कोविड सेंटर आरमोरी येथे काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाकडून ऑन ड्युटी वैद्यकीय नोडल अधिकारी डॉ. अभिजीत मारबते यांना मारहाण झालीय. राज्य सरकार काय कारवाई करणार❓@rajeshtope11 @Dwalsepatil @bb_thorat @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @DrAbhayBang1
1/3 pic.twitter.com/js5vsQvJwV— Pravin Sindhu 🇮🇳✊ (@PravinSindhu) May 12, 2021
राजकीय गुंडगिरीत गडचिरोली मागासलेली नाही!
गडचिरोलीत माजी आमदार आनंदराव गेडाम. काँग्रेसचे नेते. त्यांचे सुपुत्र खरंतर कु लिहिले पाहिजे. सिद्धार्थ गेडाम. त्याने कोरोना नियंत्रणासाठी आपलं कर्तव्य बजावत असलेले कोरोना नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांना घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केला. एका तरुण डॉक्टरला सर्वांसमोर मारहाण केली. हल्ला झाला तेव्हा डॉ. मारबते कर्तव्य बजावत होते. तेवढ्यात सिद्धार्थ गेडामने मारहाण केली. त्यावेळी सिद्धार्थने मास्कही घातलेला नव्हता. कोरोना संकटात आपला जीव धोक्यात घालत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ला खपवूनच घेतला जाऊ शकत नाही. असं करायाची हिंमत होतेच कशी. आज गेडाम आमदार नसतील पण तरीही पक्ष सत्तेत असल्याचा एक माज असावा. कोण आपलं काय बिघडवणार असा एक समज सत्तेतील अनेकांच्या पुढच्या पिढ्यांना वारसागत मिळतो. भिनतो.
एका आठवड्यातील या तीन घटना आहेत. सत्ताधारी पक्षांशी संबंधित. भाजपा सत्तेचा माज दाखवते. भाजपाचे नेते मिजास करतात. केंद्रातील सत्तेचा वापर करून विरोधातील सत्ता असणाऱ्यांना राज्यांना छळतात. असे नेहमीच बोलले जाते. बऱ्याचदा तसे असतेही. एक पर्याय म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात. त्यात पुन्हा लोकांना दिल्लीला काय झाले आणि यूपीला काय झाले, त्यापेक्षाही त्यांच्याशी कोण कसं वागते, त्यांच्या सभोताली काय घडते ते जास्त महत्वाचे. त्यामुळे भान राखा. आघाडीतील पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांना समज द्यावी. सत्ता तेव्हाच टिकते जेव्हा लोकांना ती आपली वाटते. जर सामान्यांना सत्ता आपली वाटली नाही, ती माज दाखवणारी वाटली तर ती खुपते. आणि जे खुपतं ते टिकत नाही. त्यामुळे पर्याय म्हणून उभं ठाकायचं असेल तर सत्तेत सेवेचा पॅटर्न असला पाहिजे, माजाचा नाही!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्तमाध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite